“१६ मे रोजी…”, अजित पवारांबरोबरच्या प्रवासात काय ठरलं होतं? प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेबाबत अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं!
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक उलटसुलच चर्चा रंगल्या. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चा आणि बैठकांचे कथित व्हिडिओही समोर आले. तसंच, अजित पवारांनी जयंत पाटलांच्या घरी जाऊन बैठका घेतले असल्याचंही शरद पवार गटातील नेत्यांनी सांगितलं. दरम्यान, हे दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे संयुक्तिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले असते, अशी माहिती आज रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर अमोल कोल्हे यांनीही उत्तर दिलं आहे.
रोहित पवार म्हणाले,संयुक्तिक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अमोल कोल्हे झाले असते. अशी दादांची इच्छा होती. त्यामुळे अमोल कोल्हे प्रामाणिकपणे पुढाकार घेत होते. याबाबत अमोल कोल्हे, सुप्रिया ताई, शशिकांत शिंदेंनी सांगितलंय. दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाकरता जयंत पाटलांच्या घरी १३ बैठका झाल्या आहेत. पाहिजेतर सीसीटीव्ही फुटेज तपासा. जयंत पाटलांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.”
अमोल कोल्हे काय म्हणाले?
“जे काही ठरलं होतं ते पब्लिक डोमेनमध्ये बऱ्याचदा आलेलं आहे. दोन्ही पक्षाच्या एकत्रिकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, ही वस्तुस्थिती आहे. १६ मे रोजी मी अजित पवारांबरोबर प्रवास केला होता. बारामती ते पुणे असा हा प्रवास होता. तेव्हापासून मी या प्रक्रियेमध्ये आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची प्रचारसभा संपवून आम्ही हा प्रवास केला होता”, असं अमोल कोल्हे म्हणाले. तसंच, दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाकरता १४ बैठका झाल्या होत्या, ११ वेळा जंयत पाटलांच्या घरी बैठका झाल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे”, यावरही त्यांनी जोर दिला. साम मराठीने घेतलेल्या मुलाखतीत अमोल कोल्हेंनी वरील भाष्य केलं आहे.
प्रफुल पटेलांचं म्हणणं काय?
आमचा पक्ष वेगळा आहे. आमच्या पक्षातील नेतृत्त्वाची जागास पक्ष संघटनेची जागा भरण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे अजित पवारांच्या निधानानंतर अशी चर्चा करणं योग्य नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले.