दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणात पटेल अन् तटकरेंमुळे अडथळा येतोय का? सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणात पटेल अन् तटकरेंमुळे अडथळा येतोय का? सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

 

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. आम्हाला राजकारण करायचे नाही. आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला. हा राजकारणाचा विषय नाही. दादा गेल्याने आम्ही सर्वच भावनिक आहोत. जगात माणुसकी उरली आहे की नाही. दादा गेल्यावर अजूनही विश्वास बसत नाही. आम्ही आता पुढे पाहत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, आम्ही कधी स्वतःसाठी राजकारण केले नाही. आम्ही या देशाचे, राज्याचे सेवक आहोत. लोकांनी आम्हाला निवडून दिले. आमचे मुख्य ध्येय काय आहे, तर लोकांची काम करावी. मतदारसंघाचा विकास करावा. लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. रोहितची अस्वस्थता ही सहाजिक आहे. रोहित सातत्याने ती उत्तरे शोधत आहे. आमच्या घरात जे झाले, ते कुणाच्याही घरात होऊ नये हाच विचार आहे. चौकशी पारदर्शक झाली पाहिजे, ही तमाम महाराष्ट्राची मागणी आहे. जे काही सत्य असेल ते बाहेर येईल असे मला वाटते, असेही त्या म्हणाल्या. 

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणात पटेल अन् तटकरेंमुळे अडथळा येतोय का?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामुळे अडथळा येत आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना, हात जोडत सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी असे म्हटले. आज माझा भाऊ नाही. माझा दादा मोकळ्या मनाचा होता, ते ऑफ दि रेकॉर्ड पत्रकारांशी बोलले आहेत. त्यामुळे या विषयावर मी काय बोलू? ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहणार आहे. आता कुणासोबत काय खोटे करायचे, जे खरे आहे ते सर्वांना माहिती आहे. कामाला लागा हीच दादांना आता सर्वात मोठी श्रद्धांजली असेल, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.

दरम्यान, शरद पवार हे पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवणार का, यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात महाविकास आघाडीचे घटक पक्ष पुढील ८ ते १० दिवसात निर्णय घेतील. विमान अपघातासंदर्भात उद्धवसेना आणि काँग्रेसने संसदेत चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही एकत्र असू. लवकरच महाविकास आघाडीची बैठक होईल. त्यात पुढील निर्णय होईल.