भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणी महिन्याभरापासून आरोपींच्या संपर्कात, पोलिसांची माहिती

भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणी महिन्याभरापासून आरोपींच्या संपर्कात, पोलिसांची माहिती

 


दौंड: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एका २१ वर्षीय तरुणीचे भररस्त्यात अपहरण झाल्याची खळबळजनक घटना १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. ही घटना लग्नाच्या खरेदी करून घरी परतत असताना घडली असून तरुणीचे लग्न २२ फेब्रुवारीला होते. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला आणि भिगवण बंदची हाक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी तिच्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून लग्नाच्या खरेदी करून घरी जात होती. यावेळी आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली आणि आई व भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकले. डोळ्यांची प्रचंड आग होऊन दृष्टी बिघडल्याने दोघांना काहीच दिसेनासे झाले. या संधीचा फायदा घेऊन आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून पळ काढला.

या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात अपहरण आणि जबरी चोरीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले की, आरोपी दोघे सख्खे भाऊ आहेत जहीर हारून शेख आणि अयान हारून शेख. पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी राहतात आणि ओळखीचे आहेत. दोघांमध्ये एक महिनाभरापासून फोनवर बोलणे आणि टेक्स्ट मेसेज होत होते. पोलिसांनी १२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यानचे कॉल डिटेल्स तपासले असून, नियमित सिम कार्डवरून बोलणे झाल्याचे समोर आले आहे. व्हॉट्सअॅप डेटा मागवण्यात आला असून, त्यातून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

पोलिस ॲक्शन मोडमध्ये

घटनेनंतर लगेच पोलिसांनी चार ते सहा विशेष पथके रवाना केली आहेत.

१६५ किलोमीटरचा रूट मॅप तयार करून तपास सुरू आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला जात आहे.

आरोपींचे फोन बंद असल्याने मोबाइल लोकेशन तपासणी सुरू आहे.

अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले की, लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल.

पोलिसांचे आवाहन

घटनेच्या रात्री मोठ्या संख्येने नागरिक पोलिस ठाण्याबाहेर जमले आणि आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. काही ठिकाणी टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आणि महामार्ग रोखण्यात आला. पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत, आंदोलने किंवा अफवा पसरवू नयेत, असे सांगितले आहे. कोणत्याही धार्मिक तणाव निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी, अन्यथा संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला आहे. सर्व संघटनांना आणि नागरिकांना अफवांना बळी न पडता पोलिस तपासावर विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.