अजित पवारांचा अपघात की घातपात? तपास कुठपर्यंत आला? सीआयडीची पत्रकार परिषदेत मोठी माहिती
अजित पवारांचं २८ जानेवारी रोजी बारामतीत विमान दुर्घटनेत निधन झालं. मात्र, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवारांच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी काही पत्रकार परिषद घेऊन अनेक सवाल उपस्थित केले आहेत. अजित पवारांचा अपघात की घातपात? याबाबत विरोधकही अनेक प्रश्न विचारत आहेत.
दरम्यान, अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचा सीआयडी (CID) तपास करत असून या विमान अपघाताचा तपास आत्तापर्यंत कुठपर्यंत आला? तपासात सीआयडीच्या हाताला काय लागलं? तपास नेमकं कोणत्या दिशेने सुरू आहे? याबाबतची सविस्तर माहिती आज सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘अजित पवारांचा घातपात निष्पन्न झाल्यास सीआयडी योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करेल’, असं यावेळी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
सुनील रामानंद काय म्हणाले?
सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद म्हणाले की, “अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आता या तपासाचा उद्देश काय? तर अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपात आहे का? हा या तपासाचा एक उद्देश आहे, म्हणजे अजित पवारांचा घातपात की अपघात? याचा तपास करण्यात येत आहे. किंवा इतर कोणतं गुन्हेगारी कृत्य घडलं आहे का? हा या तपासाचा स्कोप आहे. यामध्ये तीन गोष्टी, क्रिमिनल कॉनप्रन्सी किंवा कट, क्रिमिनल Negligence आणि कोणतंही गुन्हेगारी कृत्य या अॅगलने सीआयडीचा तपास सुरू आहे”, असं सुनील रामानंद यांनी सांगितलं.
“या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की अजित पवारांच्या मृत्यूचा तपास अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे. यामध्ये बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यातील फॉरेन्सिक सायन्स लॅब आणि इतर काही एजन्सी, तसेच केंद्रातील अनेक संस्था, या तपासात आपल्याला सहकार्य करत आहेत. तसेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) यांच्याशी सातत्याने सीआयडी समन्वय साधून आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा तपास संपल्यानंतर त्यांचा अहवाल देखील आपण प्राप्त करून आपल्या तपासात त्याचा निष्कर्ष लक्षात घेणार आहोत”, असंही सुनील रामानंद यांनी स्पष्ट केलं.
“सदर घटनेचा तपास महाराष्ट्र सरकारने सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. थोडक्यात या तपासात क्रिमिनल कॉनप्रन्सी किंवा कट वैगेरे, तसेच क्रिमिनल Negligence आणि कोणतंही गुन्हेगारी कृत्य असं काही निषन्न झाल्यास सीआयडी योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयात अभियोग चालवेल”, असं सुनील रामानंद यांनी सांगितलं आहे.