बारामती शहरात तरुणीला रस्त्यात अडवून शिवीगाळ व अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न;  गुन्हा दाखल; आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी

बारामती शहरात तरुणीला रस्त्यात अडवून शिवीगाळ व अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल; आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी

 

बारामती: बारामती शहरात एका तरुणीला रस्त्यात अडवून तिला शिवीगाळ करत स्वत:च्या घरी नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ आरोपीला ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात पाठवल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली.

ओंकार अशोक जाधव (रा. हरीकृपानगर, बारामती) असं या आरोपीचं नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बारामती शहरातील देशमुख चौक परिसरात एक तरुणी दुचाकीवरून जात असताना ओंकार जाधव याने तिला रस्त्यातच अडवलं. तिच्या दुचाकीची चावी हिसकावून घेत तिला स्वत:च्या घरी नेऊन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. संबंधित तरुणीने बारामती शहर पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी स्त्रीच्या लज्जेस धक्का पोहोचवणे, अपहरण करणे, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी ओंकार जाधव याला अटक केली.

आरोपीला न्यायालयात हजार केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार शहर पोलिसांनी या आरोपीला येरवडा मध्यवर्ती कारागृहात दाखल केले आहे. दरम्यान, बारामती शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा दक्ष आहे. महिलांशी छेडछाड अथवा महिलांना त्रास होईल अशी कृत्ये केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिला आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार उदय टापरे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.