'अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी', राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

'अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी', राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

 


मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमागचं कारण सुनील तटकरे यांनी सपष्ट केलं आहे. "आम्ही आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रमुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजित दादांचा जो अपघाती निधन झालं त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलं. या संबंध प्रकाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी, असं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वस्त केलं की, उद्या केंद्रीय गृह मंत्र्यांकडे राज्य सरकारकडून पत्र व्यवहार केला जाईल. ही सर्व चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सीबीआयच्या माध्यमातून करु इच्छित आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून पावलं उचली जाणार आहेत", अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

"सीबीआय तपास करेल तेव्हा आणखी व्यापक पद्धतीने तपास होऊ शकतो. ज्यावेळेला स्वायत्त यंत्रणा तपास करत असतात त्यावेळेला बाह्य देशातील सुद्धा तपास यंत्रणांची मदत होऊ शकत असते. त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सखोल पद्धतीने तपास व्हावा अशी मागणी आहे. या प्रकरणात जे मुद्दे उपस्थित होतात त्या मुद्द्यांसह तपास केला जावा आणि तपासाचा निष्कर्ष लवकराच लवकर देशाच्या जनतेसमोर आणावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका होती. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि प्रदीर्घ चर्चा केली", अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांची भेट

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीवरही सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. "भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते. आमची आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ सुद्धा भेट झालेली होती. त्या भेटीचं कारण वेगळं होतं ते मी तुम्हाला सांगेलच. राज्यभरात जिल्हा परिषदाच्या निवडणुका झाल्या आहेत, त्यामध्ये आपण कशाप्रकारे एकत्रपणे वाटचाल करु शकतो, याबाबत त्यांनी चर्चा केली", असं तटकरे यांनी सांगितलं.

"त्यांच्याकडे वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये काय संख्याबळ आहे याची माहिती होती. माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्याबाबत माहिती होती. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका काय या संदर्भात आम्ही चर्चा केली. मग या सदंर्भातील निर्णय एकत्रितपणे कसा घेता येईल, याबाबत आम्ही चर्चा केली. चर्चा अतिशय समाधानकारक होती. सौहार्दाच्या वातावरणात होती. भाजप आमच्या एनडीएमधला प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे मित्रपक्षांचा सन्मान आणि आदर करण्यातून अत्यंत चांगली चर्चा झाली", अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली.