दादांच्या अपघातामागे संशयाचा धूर; लिंबू-मिरची उतारा; ब्लॅक बॉक्सपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरितच

दादांच्या अपघातामागे संशयाचा धूर; लिंबू-मिरची उतारा; ब्लॅक बॉक्सपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरितच

 

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत सखोल चौकशीची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला असून, “नेहमी प्रत्येक बाबतीत सतर्क असलेला नेता अचानक विमान अपघातात कसा काय कायमचा निघून गेला?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. या अपघातामागील नेमकी कारणे काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अपघातग्रस्त विमानाचे अवशेष विशेष तपासासाठी मुंबईला हलवण्यात आले आहेत. या अपघातानंतर ब्लॅक बॉक्स तपास यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आला असून, त्यातील पायलट आणि एअर ट्रैफिक कंट्रोलमधील संवाद स्पष्ट झाल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी परिसरात आढळलेल्या लिंबू-मिरची उताऱ्यांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या घटनेचा काही संबंध आहे का? असा प्रश्न काही नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, त्या काळातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा निष्कर्ष समोर आलेला नाही.

अनेकांच्या मते, अजित पवार यांचा वाढता प्रभाव, निर्णायक नेतृत्व आणि राजकीय भूमिका यामुळे त्यांचा राज्यातील जनाधार वाढला होता, याचवेळी काही हितशत्रू देखील निर्माण झाले होते. त्यामुळे – अपघाताच्या घटनेभोवती निर्माण झालेल्या संशयाच्या चर्चेला अधिक बळ मिळत – असल्याचे चित्र आहे.

शिकाऊ विमान अपघातांची मालिकाच ?

बारामती परिसरात वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या एका खासगी कंपनीची शिकाऊ विमाने अलीकडच्या काळात अनेक वेळा अपघातग्रस्त झाली आहेत. मात्र सुदैवाने या घटनांमध्ये जीवितहानी टळली होती. या पार्श्वभूमीवर, त्या काळातील शिकाऊ विमान अपघातांच्या घटनांचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी काही नागरिक आणि जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, विमानांच्या तांत्रिक स्थिती आणि सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.