शरद पवारांना राज्यसभेत पाठवण्यासाठी सुप्रिया सुळेंची दिल्लीत लॉबिंग; तर शशिकांत शिंदे जयंत पाटलांच्या मुंबईत भेटीगाठी
मात्र, मागील काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे ते राज्यसभेसाठी इच्छुक आहेक की नाही? याबाबतच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं अशी सर्वांची इच्छा असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालाचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही म्हटलं आहे. शिवाय या संदर्भात मी काल जयंत पाटील शशिकांत शिंदे आणि काँग्रेस नेत्यांना भेटले असून माझी संजय राऊत यांच्याशी चर्चा झाली आहे.
शिवाय आज उद्धव ठाकरेंची भेट मागितल्याचंही सुळे यांनी सांगितलं आहे. तर पवार साहेबांशी सर्वांचे प्रेमाचे नातं असल्यामुळे सर्वांना वाटतं की पवार साहेबांनी राज्यसभेत असावं, असंही सुळे म्हणाल्या. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचं एकमत झाल्यास शरद पवारांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मात्र, काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत संकेत दिले होते. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेच्या जागेवर दावा केला होता. संख्याबळ पाहता राज्यसभेची जागा आमचीच असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते.
शिवाय इंडिया आघाडीत गेल्या पाच वर्षांत ठामपणे राहिलेला आमचा पक्ष एकमेव असल्यामुळे राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचा हक्क असल्याचा आग्रह त्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आता शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी ठाकरेंची शिवसेना तयार होणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.