सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “जो काही वाद…”
मुंबई: अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत अकाली निधन झालं. त्यांच्या निधनानंतर चार दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी हा अतिशय घाईत झाल्याची टीका करण्यात येत आहे. शपथविधीची एवढी घाई का? याबाबत सवाल विचारले जात आहेत.
असं असतानाच शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर खोचक टीका केली. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. रामदास कदम यांच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं. ‘सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत जो काही वाद होतोय, तो अतिशय निरर्थक आहे’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर आरोप केला की अजित पवारांच्या अकाली निधनानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं. शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची तात्काळ शपथ घ्यायला लावली. रामदास कदम यांच्या या आरोपाबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारला.
यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मला असं वाटतं की याबाबत जो काही वाद होतोय, तो अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे. अतिशय चुकीच्या प्रकारचा हा वाद-विवाद होत आहे. प्रत्येक व्यक्ती स्वत:चं राजकारण यात कसं करता येईल, हाच प्रयत्न करत आहे. पण हे अतिशय चुकीचं आहे. राज्यातील मोठे नेते अजित पवार हे आपल्यातून निघून गेले आहेत आणि त्यानंतर प्रत्येक व्यक्ती राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, हे चुकीचं आहे. अशा प्रकारचं खालच्या पातळीचं राजकारण बंद झालं पाहिजे”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
रामदास कदम यांनी काय म्हटलं होतं?
रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका करत म्हटलं होतं की, ‘अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनील तटकरे यांनी अतिशय गलिच्छ राजकारण केलं आहे. शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वहिनींना (सुनेत्रा पवार यांना) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला भाग पाडलं’, असा आरोप रामदास कदम यांनी केला होता.