‘थातूर मातूर चौकशी अहवाल नको, तर…’, अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत अमोल मिटकरींची मोठी मागणी

‘थातूर मातूर चौकशी अहवाल नको, तर…’, अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत अमोल मिटकरींची मोठी मागणी

 

अजित पवारांचं बारामतीमध्ये काही दिवसांपूर्वी विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर या विमान दुर्घटनेची नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, आता विमान अपघात प्रकरणाचा प्राथमिक अहवाल समोर यायला सुरुवात झाल्याचं म्हणत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक मोठी मागणी केली आहे.

‘अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत थातूर मातूर चौकशी अहवाल नको, तर अजित पवार यांच्या आगमनापासून ते विमानात बसेपर्यंत विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज डीजीसीएने जारी करावेत’, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. या संदर्भात अमोल मिटकरी यांनी एक्सवर (ट्विटर) सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

“आदरणीय दादांच्या विमान अपघाताचा थातूर मातूर चौकशी अहवाल यायला सुरुवात झाली आहे. दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती, अहवाल सांगेल तांत्रिक चूक होती व वैमानिकाचा अंदाज चुकला व जनता मान्य करेल, महाराष्ट्र पुरावा मागतोय, DGCA नी विमानतळावरील CCTV फुटेज प्रसारित करून दादांच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा”, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.

‘अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का?’, खासदार बजरंग सोनवणेंनी व्यक्त केली शंका

“सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतंय तुम्ही पाहा. काय दिसतंय? विमान खाली जमीनीला टच होऊन मग क्रॅश झालं नाही. मला जेवढं कळतंय, विमान खाली येताना तिरकं झालं, पण जमीनीला टच होण्याआधीच विमानाचा ब्लास्ट झाला. कारण त्या ब्लास्टमध्ये देखील विमानाचा पुढचा जो भाग आहे तेथील लोक बाहेर फेकले गेले आणि त्यानंतर विमान जमीनीला टच होऊन स्फोट झाला, म्हणजे ही घटना काय असू शकते? याबाबत संशय नाही का? का त्यात बॉम्ब होता? का विमानाच्या इंजिनाचा ब्लास्ट झाला?”, अशी शंका उपस्थित करत बजरंग सोनवणे यांनी वेगवेगळे सवाल उपस्थित केले आहेत.

अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला?

‘लिअरजेट ४५’ या विमानाने अजित पवार यांच्यासह पाच जणांना घेऊन सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईतून उड्डाण केलं होतं. या विमानाचे मुख्य वैमानिक सुमित कपूर हे अतिशय अनुभवी होते. त्यांच्या नावावर १६,००० तासांहून अधिक काळ विमान उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव होता. सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी हे विमान बारामतीतील धावपट्टीच्या अगदी जवळ पोहोचलं होतं. त्यावेळी दाट धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी असल्याने वैमानिकाने लँडिंगचा पहिला प्रयत्न सोडून दिला होता. एटीसीबरोबर संपर्क साधल्यानंतर वैमानिकाने पुन्हा लँडिगचा प्रयत्न केला. त्यावेळी विमानावरील त्यांचं नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.