अजितदादांच्या नावाने उपक्रम राबविताना कुटुंबियांची पूर्वपरवानगी आवश्यक....

अजितदादांच्या नावाने उपक्रम राबविताना कुटुंबियांची पूर्वपरवानगी आवश्यक....

 

बारामती - राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने काहीही नवीन उपक्रम राबविताना या पुढील काळात त्यांच्या कुटुंबियांची लेखी परवानगी व ना हरकत घ्यावी लागणार आहे.

उपमुख्य़मंत्री सुनेत्रा पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनीलकुमार मुसळे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे या बाबत पत्र दिलेले असून आयुक्तांनी हे पत्र राज्यातील सर्वच कार्यालयांना कळविण्यात यावे व त्याची प्रत नोटीस बोर्डावर लावावी असे निर्देश दिलेले आहेत.

या पत्रात सुनीलकुमार मुसळे म्हणतात, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. दादांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान उत्तुंग असून, त्यांच्याप्रती जनमानसात मोठी आदराची भावना आहे.

या पार्श्वभूमीवर, येणाऱ्या काळात दादांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने विविध शहरांमध्ये त्यांचे पुतळे उभारणे, 'सृष्टी' किंवा स्मारके निर्माण करणे, तसेच त्यांच्या नावाने नवीन शैक्षणिक, सामाजिक संस्था किंवा चॅरिटेबल ट्रस्ट (न्यास) नोंदणी करण्याची शक्यता आहे. अशा उपक्रमांमागे अनेकदा शुद्ध भावना असते, तरीही काही ठिकाणी व्यावसायिक किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांच्या नावाचा चुकीचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्व. दादांची प्रतिष्ठा, त्यांच्या कार्याचे पावित्र्य आणि जनमानसातील त्यांची प्रतिमा जपली जावी, याकरिता आम्ही आपणास खालील विनंती करीत आहोत.

1. कुटुंबीयांची पूर्वपरवानगी : स्व. अजितदादा पवार यांच्या नावाने कोणत्याही नवीन संस्थेची, ट्रस्टची किंवा फाऊंडेशनची नोंदणी करताना त्यांच्या कुटुंबीयांची लेखी 'ना हरकत प्रमाणपत्र' घेणे अनिवार्य करण्यात यावे.

2. पुतळे व स्मारके उभारणी : सार्वजनिक ठिकाणी पुतळे उभारण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे व सर्वोच्च न्यायालयाचे जे कडक निकष (उदा. वाहतुकीस अडथळा नसावा, जागा मालकी हक्क इ.) आहेत, त्यांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. शासनाच्या परवानगीशिवाय व कुटुंबियांच्या संमतीशिवाय असे पुतळे उभारले जाऊ नयेत.

3. स्मारक व पुतळे : सार्वजनिक ठिकाणी त्यांचे पुतळे किंवा स्मारके उभारण्यासाठी नोंदणी होणाऱ्या समित्यांच्या बाबतीतही कडक नियमावली असावी, जेणेकरून त्या माध्यमातून भविष्यात कोणतेही वाद निर्माण होणार नाहीत.

4. नावाचा गैरवापर रोखणे : दादांच्या नावाचा वापर करून अनधिकृतपणे निधी गोळा करणे किंवा संशयास्पद कारभार करणाऱ्या संस्थांच्या अर्जाची सखोल चौकशी व्हावी.

5. अधिकृतता तपासणे : ज्या संस्था आधीच अस्तित्वात आहेत आणि आता नाव बदलून दादांचे नाव लावू इच्छितात, त्यांच्यावरही वरील नियम लागू करावा.

धर्मादाय आयुक्त कार्यालयाने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व जिल्हा व विभाग कार्यालयांना यासंदर्भात त्वरित निर्देश द्यावेत, अशी विनंती मुसळे यांनी केले होती, त्या नुसार धर्मादाय आयुक्तांनी हे निर्देश जारी केले आहेत.