बारामती येथे बिअरचे पैसे मागितल्यामुळे धारधार शस्त्राने हल्ला; गुन्हा दाखल
बारामती : बिअरचे पैसे मागितल्याच्या किरकोळ कारणावरून गिऱ्हाईकाने कामगारावर लाकडी दांडक्याने व धारदार शस्त्राचा धाक दाखवत हल्ला केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील प्रगती नगर परिसरात घडली आहे. या घटनेनंतर बारामतीत कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून “पोलिसांचा वचक संपला आहे का ?” अशा चर्चांना परिसरात उधाण आले आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात आदित्य मोते व त्याच्या एका मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रगती नगर येथील हर्ष मंगल बिअर शॉपी येथे संबंधित कामगार ड्युटीवर होता. दरम्यान, काही गिऱ्हाईकांनी बिअर घेतल्यानंतर कामगाराने त्यांच्याकडे बिलाची मागणी केली. मात्र पैसे मागितल्याचा राग मनात धरून आदित्य मोते व त्याच्या मित्राने संताप व्यक्त केला. रागाच्या भरात दोघांनीही कामगाराला शिवीगाळ करत “तेरे नाम” चित्रपटातील स्टाईलप्रमाणे लाकडी दांडके उगारत मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या अचानक झालेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर जखमी कामगाराने बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार आदित्य मोते व त्याच्या एका मित्राविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
बिअरचे बिल ठरले वादाचे कारण
बारामतीत किरकोळ कारणांवरून भांडण व मारहाणीच्या घटना वाढत असल्याचे घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. केवळ बिअरचे पैसे मागितल्याच्या कारणावरून कामगारावर हल्ला झाल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.