अजितदादांच्या अपघाताला २ महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही - सुप्रिया सुळे

अजितदादांच्या अपघाताला २ महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही - सुप्रिया सुळे

 


नवी दिल्ली: अजित पवार विमान अपघात प्रकरणी बेंगलुरू पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल केला आहे. हा एफआयआर महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत बोलताना कर्नाटक पोलिसांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही एफआयआरचा मुद्दा शुक्रवारी लोकसभेत उपस्थित केला.

लोकसभेत झिरो अवरमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी न्यायाची मागणी केली. त्या म्हणाल्या, माझ्या भावाच्या विमान अपघाताला दोन महिने झाले. एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरूष जेव्हा जातो, तेव्हा त्याचे दु:ख त्या कुटुंबालाच माहिती असतं. आम्हीही हे भोगले आहे. दोन महिने झाले आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही. माझा भाऊ महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता. त्याला तर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांना कसा मिळणार?

मोठ्या भावाचा मुलगा रोहित पवारला एक एफआयआर करायला जंगजंग करावे लागले. आमच्या महाराष्ट्रात तर घेतलाच नाही. पण अनेक राज्यांमध्ये जाऊन त्याने एफआयआर घेण्यासाठी विनवण्या केल्या. एक एफआयआर करायला एवढी अडचण? जर या देशाच्या उपमुख्यमंत्र्यांचा एवढा मोठा अपघात होऊनही एफआयआर होत नाही, तर सामान्य माणसांनी जायचं कुठे?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

अजित पवार जेवढा माझा भाऊ होता, तेवढाच महाराष्ट्रातील प्रत्येक मनातील लाडका नेता होता. एवढ्या मोठ्या नेत्याचा एवढा मोठा अपघात झाल्यावर चौकशी व्हायला नको? माझी महाराष्ट्र आणि भारत सरकारला हात जोडून विनंती आहे, की अपघातांची पारदर्शक चौकशी व्हावी. प्रत्येक कुटुंबासाठी न्याय समान असला पाहिजे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांनी काल यावर भाष्य केले, असे सांगत सुप्रिया सुले म्हणाल्या, त्यांना माझी एवढीच विनंती आहे की, टाईमबाऊंड मॅनरमध्ये ही चौकशी झाली पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तर सरकारने दिली पाहिजेत. अजित पवारांसह विमानात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, अशी सरकारला माझी विनंती आहे.