मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओवर फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “जर व्हिडीओ खरा असेल तर…”
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात विरोधकांनी मंत्री नरहरी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.
मंत्री झिरवाळांच्या तृतीयपंथीयाबरोबरच्या या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘जर हा व्हिडीओ खरा असेल तर योग्य ती कारवाई होईलच’, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मला फोन केला होता, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवर संपर्क करून सांगितलं की हा जो व्हिडीओ आहे, तो व्हिडीओ तीन-चार व्हिडीओ एकत्र करून तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. त्यानंतर मी त्यांना सल्ला दिला की त्या व्हिडीओबाबत तात्काळ तक्रार दाखल करा. त्यामुळे या व्हिडीओची शहानिशा करण्यात येईल. या संपूर्ण प्रकरणाची नेमकी सत्यता काय आहे? हे तपासलं जाईल आणि याबाबत त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून योग्य तो निर्णय घेऊ”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्री नरहरी झिरवाळ हे त्यांच्या कार्यालयातील क्लर्कच्या लाचखोरीमुळे अडचणीत आले होते. याबाबतही बोलताना फडणवीस म्हणाले की, “मागच्या काळात जी घटना घडली, त्या घटनेची पूर्ण चौकशी झाली. त्यामध्ये कुठेही नरहरी झिरवाळ यांचा संबंध असल्याचं समोर आलं नाही. मात्र, आताच्या घटनेत जे काही व्हिडीओ समोर आले आहेत ते अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे गरजेचं आहे. जर ते व्हिडीओ खरे असतील तर योग्य ती कारवाई होईलच”, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मंत्री झिरवाळ का अडचणीत आले? कथित व्हिडीओत काय?
मंत्री झिरवाळ यांचा तृतीयपंथीयाबरोबरचा एक कथित व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून या प्रकरणात विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टिकेची झोड उठवली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती मंत्री झिरवाळ असल्याचा दावा विरोधक करत आहेत. या प्रकरणावरून मंत्री झिरवाळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या कथित व्हिडीओ प्रकरणाबाबत अद्याप तरी मंत्री झिरवाळ यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदार संघाचे आमदार आहेत. आता व्हायरल झालेला व्हिडीओ हा सात महिन्यापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे.