उद्योग परवानग्यांमध्ये सुलभता, वीजदरही घटणार : मुख्यमंत्री
मुंबई: महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून, ३३ परवानग्यांपैकी २० परवानग्या स्व-प्रमाण पत्रावर आणण्यात आल्या आहेत. उर्वरित १३ परवानग्यांची संख्याही लवकरच कमी केली जाईल व औद्योगिक विजेचे दर टप्प्याटप्प्याने कमी होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
रामकी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बल्क ड्रग पार्क’ व ‘लाइफ सायन्सेस हब’ उभारण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, उद्योग प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.
‘मैत्री’ला सर्वसमावेशक अधिकार असणार
उद्योगांना सुलभ वातावरण देण्यासाठी ‘मैत्री पोर्टल’ला सर्वसमावेशक अधिकार देण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मैत्री पोर्टलमुळे एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळणार आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवत अर्जाचा मागोवा घेता येणार असून, ठरावीक कालावधीत सेवा न दिल्यास संबंधित यंत्रणांवर कारवाईची तरतूद केली आहे.
टप्प्याटप्प्याने कपात
फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील वीजदर पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने कमी होणार आहेत. सध्याचा १०. ८८ रुपये प्रतियुनिट हा वीजदर पुढील पाच वर्षांत कमी होऊन तो ९.९७ रुपयेपर्यंत येणार असून, २०२८-२९ पर्यंत महाराष्ट्र देशातील सर्वात कमी वीजदर असलेले राज्य असेल, असा दावा त्यांनी केला.