आता मागेल त्याला ‘पीएनजी’! ‘एलपीजी’ टंचाईच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा

आता मागेल त्याला ‘पीएनजी’! ‘एलपीजी’ टंचाईच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा

 

पुणे : द्रवरूप नैसर्गिक वायूच्या (एलपीजी) टंचाईमुळे उद्योगांचा गॅस सिलिंडर पुरवठा बंद आहे. याचा मोठा फटका उद्योगांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगांनी मागणी केल्यास वाहिनीद्वारे नैसर्गिक वायूची (पीएनजी) जोडणी तातडीने देण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. यासाठी सर्व सरकारी विभागांनी समन्वय साधून विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उद्योगांची आढावा बैठक उद्योगमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन शर्मा, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसे व मुख्य अभियंता कैलास भांडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर आणि विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीत उद्योगांची उत्पादन क्षमता कायम राखणे ही राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. नैसर्गिक गॅस हा उद्योगांसाठी स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत असल्याने कोणत्याही उद्योगाला केवळ गॅस जोडणीअभावी अडथळे निर्माण होऊ नयेत. त्यामुळे एमआयडीसी, गॅस वितरण कंपन्या आणि जिल्हा प्रशासन यांनी एकत्रितपणे नियोजन करून प्रत्येक पात्र उद्योगापर्यंत पीएनजी जोडणी पोहोचवावी.

उद्योगांसाठी पीएनजी जोडणीसाठी मोहीम सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हानिहाय व औद्योगिक वसाहतीनिहाय विशेष शिबिरे आयोजित करून अर्ज प्रक्रिया सुलभ करणे, तांत्रिक तपासणी जलद गतीने पूर्ण करणे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे यावर भर दिला जाणार आहे. व्यवसायस्नेही वातावरणाच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

घरगुती एलपीजीला प्राधान्य

एलपीजी सिलिंडर पुरवठ्यात घरगुती ग्राहकांना प्राधान्य दिले जात आहे. व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केला जात आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार करणाऱ्या वितरकांवर जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल. असे प्रकार आढळल्यास नागरिकांनी तत्काळ ११२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे सामंत यांनी नमूद केले.