"अशोक खरातच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा, भोंदूगिरी..."; संजय राऊतांचं टीकास्त्र

"अशोक खरातच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा, भोंदूगिरी..."; संजय राऊतांचं टीकास्त्र

 

मुंबई: राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या संतापजनक लीला आता बाहेर येत आहेत. यापूर्वी एका महिलेने शोषणाची तक्रार केली होती. आता आणखी तीन महिला तक्रार करण्यासाठी पुढे आल्या आहेत, तर दुसरीकडे खरात याच्या नावावर असलेल्या मालमत्तेबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली असून, तब्बल ५२ सातबारा थेट खरात आणि  कुटुंबीयांच्या नावावर आहेत. याच दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून टीकास्त्र सोडलं आहे. 

"भोंदूबाबा अशोक खरातच्या दरबारात जाणाऱ्या सर्व मंत्र्यांना सहआरोपी करा" असं म्हणत निशाणा साधला आहे. "महाराष्ट्र हा पुरोगामी, सुधारणावादी विचारांचा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रात भोंदुगिरी  आणि  बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील तर भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खासकरून मंत्र्यांना सहआरोपी केलं पाहिजे. मंत्र्यांना सहआरोपी करेपर्यंत भोंदूगिरी थांबणार नाही." 

"जे कुणी यातून पळवाट काढत आहेत ते खोटं बोलत आहेत. अशोक खरात हे काय प्रकरण होतं ते आम्हाला माहित नव्हतं. या प्रकारचा पहिला गुन्हा अशोक खरातवर २००३ मधे दाखल झाला, २००५ मध्ये झाला आहे. नाशिकमधल्या एका वृत्तपत्रात खरातच्या कारनाम्यांबाबत लेखमालाही प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी पत्रकाराला धमक्या देण्यात आल्या." 

"२००३ आणि २००५ या दोन्ही वर्षांत गुन्हे दाखल झाले आहेत तरीही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे अशोक खरातकडे जात असतील, त्याच्या पायावर डोकं ठेवत असतील, पूजाविधी करत असतील, तंत्र-मंत्र, जादूटोणा करत असतील तर या सगळ्यांना सहआरोपी केलं पाहिजे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सक्षम अधिकारी आहेत. त्यामुळे जो मुख्य आरोपी पकडला आहे त्याचा जबाब नोंदवून घेतला जातो आहे. कुठलीही मोठी नावं आली तरीही ती दडपली जाणार नाहीत दीपक केसरकरांवर कोणी विश्वास ठेवू नका. ते पळून गेले, ज्यांना या गोष्टीचे छंद होते त्यांच्यापैकी एक गट एकत्र झाला आणि बाहेर गेले" असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.