''सर्वात जास्त पुरावे तर माझ्याकडे, विरोधी पक्षातले कोण-कोण नेते...'' मुख्यमंत्र्यांचं खरात प्रकरणावर सर्वात मोठं विधान

''सर्वात जास्त पुरावे तर माझ्याकडे, विरोधी पक्षातले कोण-कोण नेते...'' मुख्यमंत्र्यांचं खरात प्रकरणावर सर्वात मोठं विधान

 


मुंबई: ज्योतिषविद्या आणि अघोरी पूजेच्या माध्यमातून महिलांचं लैंगिक शोषण करणारा अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. शनिवारी एसआयटीने खरातची तब्बल सात तास त्याची चौकशी केली. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यातच आता रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

खरात प्रकरणात आणखी दोन पीडित महिला समोर आलेल्या आहेत आणि काही मंत्री गुंतल्याचा आरोप होतोय. यावरुन पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं. त्यावर फडणवीस म्हणाले की, हवेत बोलण्याला अर्थ नाही. खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे. लाजेखातर किंवा सामाजित दबावामुळे महिला पुढे येत नाही. पीडित महिलांना धीर देऊन समोर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होत आहे. डीजींनाही तशा सूचना दिलेल्या आहे. तसेच एसआयटी नियुक्त केलेली आहे. नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून तपास करीत आहेत. यासंदर्भात कुठल्याही परिस्थितीत कुणालाही वाचवलं जाणार नाही.

कोणाकडे पुरावे असतील तर द्या- सीएम

खरात प्रकरणावरुन होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले, कोणाकडे काही पुरावे असतील तर नक्कीच द्यावेत. केवळ राजकारण करु नये. तिकडे (खरातकडे) अनेक लोक जायचे.. विरोधी पक्षाचे कोण कोण गेलेत त्याचे पुरावे मी देऊ शकतो. माझ्याकडेच याचे सर्वात जास्त पुरावेत आहेत.. ते पुरावे पोलिसांकडे आहेत.. पण हे पोलिसांचं काम आहे. खरातांना भेटणाऱ्यांपैकी कुणाचा सहभाग असेल तर कारवाई होईल. पण केवळ कोणी भेटलं आहे, म्हणून कारवाई करायला लागलो तर मग.. कोण-कोण.. काय-काय कसं-कसं करायचं, हे पुढे येईल.

''खरात यांना ४० किलोमीटर दूर पाणी कोणी दिलं, कसं दिलं.. हे सगळं तुम्हीच दाखवलेलं आहे. याच्यात राजकारण करु नये. हा महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तथाकथित शक्तींचा उपयोग करुन महिलांना भरीस पाडलं यापेक्षा वाईट काहीच नाही. याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल. सरकार आणि पोलिसांना जे करावं लागेल, ते करण्याची तयारी आहे.'' असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

''ते सिलेक्टिव्ह आहे का?''

ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावून ४० किलोमीटर दूर पाणी दिलं, त्यांना काय शिक्षा द्यायची. मंत्र्यांबद्दल बोलणारे तिथे का गप्प आहेत? तिथे ते सिलेक्टिव्ह का आहेत? महिलांसोबत त्यांनी (अशोक खरात) चुकीचं काम केलं, याबाबत शिक्षा होणार असल्याचं फडणवीस शेवटी म्हणाले.