भावाचं अचानक निधन, वहिनी अन् दोन मुलं उघड्यावर; लहान भावाने भावजयीशी विवाह करून दिला लेकरांना आधार

भावाचं अचानक निधन, वहिनी अन् दोन मुलं उघड्यावर; लहान भावाने भावजयीशी विवाह करून दिला लेकरांना आधार

 

नांदेड: पतीच्या निधनानंतर पत्नीचा आधार हिरावला जातो. मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले जाते, नाते संबंधात देखील दुरावा निर्माण होतो. मात्र, नातेसंबंध जपण्यासाठी तसेच मृत भावाच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलांना आधार देण्यासाठी धाकट्या भावाने माणुसकी आणि कौटुंबिक जबाबदारीचा अनोखा आदर्श समाजापुढे ठेवत विधवा भावजयीसोबत विवाह केला.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील ही घटना आहे. प्रफुल पाटील यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

किनवट तालुक्यातील वझरा (बु.) येथील रहिवासी अष्टपाल पाटील यांचे फेब्रुवारी २०२६ मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. अष्टपाल यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाच डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात पत्नी विजयालक्ष्मी, एक ८ वर्षांची मुलगी आणि एक ६ वर्षांचा अंध मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब निराधार झाले होते. मुलांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरवले होते. कर्ता पुरुष गेल्याने मुलांचे शिक्षण, संगोपन आणि पत्नीचा उदरनिर्वाह कसा होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. कुटुंबाची ही दयनीय अवस्था पाहून कुटुंबातील अविवाहित असलेल्या धाकटा भाऊ प्रफुल्ल पाटील याने केवळ सहानुभूती न दाखवता एक धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला. आपल्या भावजयीला (विजयालक्ष्मी) जीवनसाथी म्हणून स्वीकारून, आपल्या पुतण्या आणि पुतणीच्या पितृछत्राची संपूर्ण जबाबदारी प्रफुल्लने स्वतःच्या खांद्यावर घेतली. कुटुंबातील लहान मुलाच्या या निर्णयाला कुटुंबीयांनीही समर्थन दिले.

प्रफुल्ल पाटील हा व्यवसायाने ऑटोरिक्षा चालक आहे. ऑटो चालवून उदरनिर्वाह करतो. अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थिती असतानाही, स्वतःच्या संसाराचा विचार करण्यापेक्षा त्याने भावाच्या मुलांच्या भविष्याला प्राधान्य दिले. "माझ्या भावाच्या पश्चात ही मुले अनाथ होऊ नयेत आणि वहिनीला समाजात सन्मानाने जगता यावे, हाच या विवाहामागचा माझा मुख्य उद्देश आहे. ही माझी केवळ जबाबदारी नसून भावाप्रती असलेले माझे कर्तव्य आहे," अशा भावना प्रफुल्लने यावेळी व्यक्त केल्या. दरम्यान प्रफुल्लच्या या निर्णयाचे ग्रामस्थांकडून कौतुक केलं जात आहे.