“देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातील झुंडशाही होऊ शकत नाही”, संजय राऊतांचे विधान

“देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातील झुंडशाही होऊ शकत नाही”, संजय राऊतांचे विधान

 

मुंबई: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळातानचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. विधान परिषदेत सोमवारी सातारा जिल्हा पोलिस अधिक्षकांसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा उपसभापती निलम गोऱ्हे यांचा निर्णय सभापती प्रा. राम शिंदे यांनी राखून ठेवला. दरम्यान शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. दरम्यान पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याच्या शंभूराज देसाई यांच्या आरोपानंतर या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्या प्रकऱणी विधिमंडळाच्या बाहेर करण्यात आलेल्या आंदोलनाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, “साताऱ्यात जे घडलं, त्या महाराष्ट्रातील सर्व झुंडगिरी, गुंडगिरीचा केंद्रबिंदु विधिमंडळाच्या इमारतीत आहे. गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा लोकशाहीचा खून झाला त्या सगळ्याचा केंद्रबिंदु विधिमंडळाच्याच इमारतीत आहे. मुळात जे लोकशाहीचा खून झाला म्हणत आहेत त्यांचेच हात लोकशाहीच्या रक्ताने रंगलेले आहेत. मला आश्चर्य वाटतं की विधिमंडळाच्या काल पायऱ्यांवर काही मंत्री आमदार होते आणि लोकशाहीचा खून झाला म्हणत होते. त्यामधील काही मंत्री जेव्हा शिवसेना सोडून गेले, तेव्हा हे वाघाचं कातडं पाघरलेले वाघ गर्जना करत होते की स्वाभिमानासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही कसा पक्ष सोडला, आणि काल त्यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कातडं पाघरलेल्या वाघांची अक्षरश: माजरं आणि बोके झाले होते.”

“सरकारमधील मंत्र्यांची अशी अवस्था का? तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्‍यांने सातारच्या रस्त्यावर बेदम चोपलंय. कुठे गेला तुमच्यातला शिवसैनिक, कुठे गेला तुमच्यातील बाळासाहेबांनी घडवलेला मर्द मावळा? तुम्ही मार खाल्लात… तुमच्याच सहकारी मंत्र्यांकडून मार खाल्लात आणि तुम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती छाती पिटताय, म्याव-म्याव करताय. शेवटी जे कर्म तुम्ही केलंत त्या कर्माचं हे फळ आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप

“देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातील झुंडशाही होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडच्या पालकमंत्र्याला चोप दिला… सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाची भूमी आहे. तिथे ग. दि. माडगूळकरांसारखे कवी जन्माला आले. एक सिनेमा आला होता, अशी साताऱ्याची तऱ्हा, आता साताऱ्यात जे घडलं आहे ती साताऱ्याची तऱ्हा संपूर्ण महाराष्ट्राची तऱ्हा झाल्याचे दिसत आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

सरकारमधील मित्रपक्ष फार काळ एकत्र राहाणार नाहीत. नाहीतर त्यांना रोज रस्त्यावर पोलिसांचा मार खावा लागेल हे दिसतंय, ही सुरूवात आहे. सत्तेच्या बळावर ते शिवसेना फोडू शकले तर जे फुटलेत त्यांनाही फोडू शकतात आणि रस्त्यावर फोडू शकतात हे भाजपाच्या कृतीमधून स्पष्ट दिसलं आहे, असेही संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले.