बारामतीत एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; मायलेकीचा जागीच मृत्यू, वडिलांसह दोन वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी

बारामतीत एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; मायलेकीचा जागीच मृत्यू, वडिलांसह दोन वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी

 


बारामती : तालुक्यातील बारामती-पारवडी मार्गावर बुधवारी (ता. ४) रात्री झालेल्या अपघातात मायलेकीचा दुर्दैवी अंत झाला. यात वडील व दोन वर्षांचा मुलगा यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. 

मयूर कोकणे हे आपली पत्नी रुपाली, मुलगी सानवी व दोन वर्षांचा मुलगा कृष्णा यांच्यासह बारामतीहून पारवडीनजीक असलेल्या घरी दुचाकीवरुन निघाले होते. परीटवस्तीनजीक समोरुन चुकीच्या दिशेने आलेल्या मारुती व्हॅगनर (गाडी क्रमांक एमएच ४२ - बीजे १४०४) या चार चाकी गाडीने त्यांना समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रुपाली कोकणे (वय २५) व सानवी कोकणे (वय ५) या मायलेकींचा मृत्यू झाला.

अपघातानंतर चारचाकी वाहन चालकाने गाडी तेथेच सोडून पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर रुपाली कोकणे व सानवी कोकणे यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे त्यांची प्राणज्योत मालविल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, दोन वर्षांच्या कृष्णा या मुलावर पुण्यातील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मयूर कोकणे यांनाही ब-याच ठिकाणी मार लागला असून त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात नेमका कशामुळे झाला या बाबतची माहिती अद्याप उपलब्ध नाही. या अपघातानंतर संबंधित चारचाकीचा चालक गाडी घटनास्थळी सोडून पळून गेल्याचेही समोर आले आहे. या बाबत सचिन शिवाजी कोकणे यांनी फिर्याद दिली आहे.