पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने ४ गाड्यांना उडवले, ८ जण गंभीर जखमी
प्राथमिक माहितीनुसार, सातारा दिशेकडून पुण्याकडे येणारा कंटेनर अचानक नियंत्रणाबाहेर गेला. उतार असलेल्या या घाट रस्त्यावर कंटेनरने पुढे असलेल्या चारचाकी वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की, चार कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही वाहनांच्या काचा फुटल्या, तर गाड्यांचे सुटे भाग रस्त्यावर विखुरले गेले. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अपघातानंतर स्थानिक नागरिक, इतर वाहनचालक आणि प्रवाशांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे, तर बहुतेक किरकोळ जखमी आहेत.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांची मोठी कोंडी लागली. पोलिस आणि वाहतूक पथकाने घटनास्थळावरील वाहने बाजूला करून वाहतूक हळूहळू सुरळीत केली. मात्र, अपघातग्रस्त परिसरात अजूनही काही प्रमाणात वाहतूककोंडी कायम आहे.
अपघातांचा 'हॉटस्पॉट'
पुणे-सातारा महामार्ग हा अपघातांचा 'हॉटस्पॉट' म्हणून ओळखला जातो. नवले पुल आणि जांभुळवाडी दरी पुल परिसरात उतार, वळण आणि वेगामुळे असे अपघात वारंवार घडतात. पोलिसांनी अपघाताचे कारण तपास सुरू केले असून, कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा संशय आहे.