बारामतीत सोमवारपासून सिलिंडरअभावी परिस्थिती गंभीर होण्याची भीती....

बारामतीत सोमवारपासून सिलिंडरअभावी परिस्थिती गंभीर होण्याची भीती....

 


बारामती: युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडर्सचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे आता हॉटेल, कँटीन, मेस चालक हवालदिल झाले आहेत. शिल्लक सिलिंडरच्या साठयात पदार्थ बनविण्यासह अनेकांनी आता चूलीसह डिझेलवरील भट्टी कार्यान्वित केल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली.

कोणत्याही परिस्थितीत हॉटेल बंद न करता आहे या परिस्थितीत ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न बारामतीतील हॉटेल व्यावसायिक करताना दिसत आहेत. सिलिंडरचा पुरवठाच नसल्याने अनेकांची कोंडी झालेली असताना पर्याय शोधून व्यवसाय सुरळीतपणे सुरु राहिल याचा प्रयत्न हॉटेल व्यावसायिक करताना दिसत आहेत.

काही ठिकाणी लाकडे आणून चूल पेटवून त्यावर पदार्थ तयार करण्याचे धोरण काही व्यावसायिकांनी अवलंबिले असून काही मिठाई विक्री व पदार्थ निर्मिती करणा-या व्यावसायिकांनी पुन्हा एकदा डिझेलवरची भट्टी कार्यान्वित केलेली आहे. डोसा, उत्तप्पा या सारखे अधिक गॅस लागणारे पदार्थ बारामतीतील हॉटेलच्या मेनूकार्डवरुन गायब झाले असून काही ठराविकच पदार्थ उपलब्ध करुन देण्याकडे हॉटेल्सचा कल आहे.

घरगुती सिलिंडरसाठी लोकांची गर्दी....

घरगुती सिलिंडर मिळावा या साठी गॅस वितरकांच्या दारात सकाळपासूनच लोक रांगा लावून उभे असल्याचे चित्र गेल्या तीन दिवसांपासून शहरात आहे. दैनंदिन बुकींगचे प्रमाण एकदम पाचपट वाढल्याने गॅस वितरकांची यंत्रणाच कोलमडून गेली आहे.

भीतीपोटी ज्यांच्याकडे सिलिंडर आहेत तेही लोक मागणी करु लागल्याने यंत्रणेवर अतिरिक्त ताण आल्याचे गॅस वितरकांनी सांगितले. जेथे दररोज नऊशे सिलिंडरची मागणी असते तीच मागणी आता थेट पाच हजारांवर गेल्याने वितरकही गडबडून गेले आहेत.

ओटीपीमुळे अधिकच मनस्ताप...

ओटीपीशिवाय सिलिंडर दिला जाणार नाही ही वितरकांची भूमिका आहे. अनेकदा यंत्रणेवरील ताणामुळे वेळेत ओटीपी येत नाही, ग्रामीण भागात रेंजची समस्या असते, अनेकदा ज्यांच्याकडे मोबाईल असतो ते शेतात किंवा इतर ठिकाणी गेलेले असतात, काही जणांना ओटीपी नीट सांगता येत नाही, अचानकच यंत्रणेवरील ताण वाढल्याने ओटीपी वेळेत न मिळणे या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

प्रशासन लक्ष ठेवून....

या परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असल्याची माहिती तहसिलदार स्वप्नील रावडे यांनी दिली. घरगुती सिलिंडरची कसलीच अडचण नसून विनाकारण लोकांनी दुकानांपुढे रांगा लावण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. फिरत्या पथकांदवारे तपासणी सुरु आहे, व्यावसाय़िक सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे व्यावसायिकांना अडचणी येत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

सोमवारनंतर संकट गडद होणार...

सोमवार (ता. 16) नंतर सिलिंडरचा पुरवठा झाला नाही तर हॉटेल, मेस, कँटीन चालकांवरील संकट अधिक गडद होणार आहे. बारामतीतील पन्नास टक्के हॉटेल बंद करण्याची वेळ येईल, असे बारामती हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश साळुंके यांनी सांगितले. ग्रामीण भागातील चायनीज व इतर व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प असून अनेक हॉटेल सोमवारनंतर चालविणे अवघड होणार आहे.

आचा-यांकडून ऑर्डर रद्द....

सिलिंडरच्या तुटवडयाने बारामतीतील तीस ते चाळीस आचारी व्यावसायिकांनी काम घेणेच सध्या थांबविले आहे. सिलिंडर नसल्याने ऑर्डर रद्द करण्याकडेच त्यांचा कल अधिक आहे. अनेकांकडे विविध कार्यक्रमांच्या जेवणाच्या ऑर्डर होत्या पण त्या रद्द कराव्या लागल्याचे संपतलाल शर्मा यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत काम करणा-या कर्मचा-यांवरही उपासमारीची वेळ आली आहे.