“शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही निर्णय घेतले”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शेतकरी अधिवेशनाला अलोट गर्दी

“शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही निर्णय घेतले”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शेतकरी अधिवेशनाला अलोट गर्दी

 

नांदेड: कायदे शेतकऱ्यांसाठी असतात; शेतकरी कायद्यांसाठी नसतो. काहींनी बळीराजाचा वापर करून त्याचाच बळी घेतला, पण आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ठोस निर्णय घेतले, अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर तोफ डागली. नांदेड-लोहा येथे पार पडलेल्या भव्य शेतकरी अधिवेशन व पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे  यांनी शेतकरी हित, विकासकामे आणि विरोधकांवर जोरदार टीका करत दमदार राजकीय संदेश दिला. 

एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री कार्यकाळातील निर्णयांचा आढावा घेत सांगितले की, पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत चार सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली तसेच बंद पडलेला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला. राज्यातील ४.२९ लाख कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देत ३२.४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून मराठवाड्यावरचा ‘दुष्काळवाडा’ हा शिक्का पुसून टाकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

एक रुपयात पीक विमा योजना सुरू

शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी अवकाळी पाऊस व अतिवृष्टीसाठी एन डी आर एफच्या निकषात बदल करून दुप्पट मदत देण्याचा निर्णय, नुकसान भरपाईची मर्यादा २ हेक्टरवरून ३ हेक्टरपर्यंत वाढवणे, सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीलाही मदत सुरू करणे तसेच वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. याशिवाय, एक रुपयात पीक विमा योजना सुरू करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारच्या योजनेसोबत राज्य सरकारकडून अतिरिक्त सहा हजार

केंद्र सरकारच्या योजनेसोबत राज्य सरकारकडून अतिरिक्त सहा हजार रुपये देत ‘नमो शेतकरी’ योजनेचा विस्तार करण्यात आला असून राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचाच आहे, असे ते म्हणाले. कर्जमाफीबाबत बोलताना त्यांनी २ लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन देण्यात आल्याचे सांगितले. मुख्यमंत्री सहायता निधीतून ४५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या समस्या थेट सोडवण्याचा निर्धार

आपत्तीच्या काळात घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी दसऱ्याच्या वेळी कार्यकर्त्यांना मुंबईत न बोलावता थेट शेतकऱ्यांच्या मदतीला पाठवले आणि “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी जोडधंदे उपलब्ध करून देणे, शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात शेतकरी नेते शंकरराव धोंडगे यांच्या शिवसेना प्रवेशाचे स्वागत करत ते म्हणाले की, ते फक्त नांदेडचे नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी चळवळ अधिक बळकट होईल. प्रत्येक गावात शेतकरी संघटना उभारून शेतकऱ्यांच्या समस्या थेट सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दिलेला शब्द कधी मोडू नका

शब्द देताना दहा वेळा विचार करा; पण दिलेला शब्द कधी मोडू नका, असे सांगत आपण दिलेला शब्द पाळणारा नेता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, संघर्षातून मुख्यमंत्री झालो; सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, असे सांगत त्यांनी आपल्या प्रवासाची आठवण करून दिली. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे सांगत राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा, असा संदेश त्यांनी दिला. सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, असे सांगत त्यांनी स्वतःची ओळख सर्वसामान्यांशी जोडली.

दरम्यान, भाषणाच्या शेवटी त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले, मी देवाकडे एकच मागतो माझा शेतकरी सुखी होऊ दे, त्याच्या आत्महत्या थांबू देत. नांदेडमधील या सभेतून उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे  यांनी शेतकरी हित, विकास आणि सर्वसामान्यांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.