एका बॅनरवरील चूकीमुळे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली दिलगिरी

एका बॅनरवरील चूकीमुळे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली दिलगिरी

 

अलिबाग: कधी कधी अति उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी केलेली छोटीशी चूक नेत्यांच्या अंगलट येऊ शकते, याचा प्रत्यय सध्या रायगडकरांना येत आहे. पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमातील एका बॅनरवरील चूकीमुळे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली आहे.

झाले काय ?

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघात इंदापूर विभागात २७ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नवनियुक्त सदस्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडला. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र कार्यक्रमाच्या मंचावर लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा फोटो लावण्यात आला नव्हता. या बॅनरमुळे सध्या रायगड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून या चूकीचा दाखला देऊन खासदार सुनील तटकरे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

या कार्यक्रमाचे फोटो सध्या समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. बॅनरवर स्थानिक पदाधिकारी आणि तटकरे कुटूंबातील सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचे सदस्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. पण बॅनरवर स्व. अजित पवार आणि पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो वापरण्यात आलेला नाही, खासदार तटकरे यांना लक्ष केले जाऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी समाज माध्यमांवर हा फोटो शेअर करत टीका केली. मालकाला अगगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच सात बारा आपल्या नावावर करतो, याचे जिवंत उदाहरण असे म्हणत रोहीत पवार यांनी टीकास्त्र डागले आहे. तर अमोल मिटकरी यांनीही ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. त्यांचा फोटो हटवला जातोय. हे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही असे म्हणत टीप्पणी केली आहे. दैवतांना डावलून स्वतः देव बनण्याचा प्रयत्न करू नये महाराष्ट्र हे सहन करणार नाही असे म्हणत पक्षाच्या प्रोटोकॉलची आठवण त्यांनी करून दिली आहे.

मंत्री आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण काय?

रोहीत पवार आणि अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेनंतर या बॅनरबाबत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. झालेल्या चूकीबद्दल दिलीगिरीही व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर असे कर्यक्रम कार्यकर्त्यांकडून आयोजित केले जातात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात दिवंगत नेते अजित पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राकाकी पवार यांचा फोटो नव्हता, याबद्दल मी दिलीगिरी व्यक्त करते.

अजितदादा असतील, सुनेत्राकाकी असतील यांचं आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये. तरी, यानिमित्ताने एक बरे झाले- स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आले. हा मुद्दा चवीने चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे..! बाकी काकींना पक्षाच्या कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच. असे स्पष्टीकरण आदिती तटकरे यांनी एक्स या समाजमाध्यमांवर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

तटकरे कुटूंबाला सातत्याने घेरण्याचे प्रय़त्न सुरू आहेत का?

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांच्याकडून सातत्याने खासदार सुनील तटकरे यांना लक्ष्य केले जात आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रय़त्न केल्याचा खळबळ जनक आरोप रोहीत पवार यांनी नुकताच केला होता. आता पुन्हा एकदा रोहीत पवार यांनी तटकरे यांच्यावर टीका केल्याने, शरद पवार गटाकडून तटकरे यांना लक्ष्य केले जात असल्याचे दिसून येत आहे.