माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड
माळेगाव: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर माळेगावची धुरा आता सुनेत्रावहिनींकडे आली आहे. निवडीनंतर माळेगाव हा राज्यातील अग्रगण्य कारखाना बनवण्याचं अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार सुनेत्रा पवार यांनी केला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक आज पार पडली. यापूर्वी झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची ब वर्गातून संचालक म्हणून निवड करण्यात आली होती. आज अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी काम पाहिलं.
सहकारी तत्वावर चालणारा माळेगाव कारखाना राज्यात अग्रगण्य व्हावा या उद्देशानं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्या अनुषंगाने त्यांनी कारखाना व्यवस्थापनात अनेक बदल करत काटकसरीने कारभार सुरू केला होता. मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने कारखान्याची धुरा आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवली आहे. आज झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माळेगावला राज्यात अव्वल क्रमांकांचा कारखाना बनवण्याचं अजितदादांनी पाहिलेलं स्वप्न सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण करण्यावर आपला भर असेल अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी निवडीनंतर दिली. अजितदादांनी ज्या पद्धतीने कामकाज केलं, त्याच पद्धतीने काटकसर करत संचालक मंडळ, शेतकरी सभासद, कामगार आणि प्रशासनाला सोबत घेऊन वाटचाल करू असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.