"सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली...." अमोल कोल्हेंची रुपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका

"सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली...." अमोल कोल्हेंची रुपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका

 


वादग्रस्त आध्यात्मिक गुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील कथित संबंधांवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. रुपाली चाकणकर या फरार झाल्या असल्याचे बोलले जात असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चाकणकर यांच्यावर कवितेतून बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.

अमोल कोल्हे यांची कविता

महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताड्कन तडा गेला

जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याच्या पाटील पितृतुल्य झाला!

त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली

सामाजिक, कौटुंबिक कि वैयक्तिक सारी सीमारेषाच पुसट झाली.

काठी आधाराची होती खरी, पण स्वार्थापायी मोडून पडली

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्येची पुन्हा एकदा शिळा झाली

सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली,

गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म साऱ्या साऱ्या अक्षरधनाची अक्षरश: होळी झाली….

काय आहे प्रकरण?

स्वत:ला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाला नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी कथित लैंगिक छळाच्या प्रकरणात अटक केली आहे. त्याचे ५८ व्हिडिओ बाहेर आले आहेत. खरातचे बड्या राजकारण्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरातच्या ट्रस्टवर विश्वस्त असल्याचे समोर आले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या अध्यक्षाचे जर आरोपीशी संबंध असतील तर पीडित महिलांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवालही केला जात आहे.

दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारकडून धडाकेबाज पोलिस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्तवाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक नवे खुलासे समोर येत आहे. खरात याची २०० कोटींची मालमत्ता असल्याचे सांगितले जात आहे तर दुसरीकडे रुपाली चाकणकर अद्याप पोलिसांसमोर आलेल्या नाहीत. रुपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकर फरार असल्याचा दावा केला आहे.