“रुपाली चाकणकर स्वतः तंत्रमंत्र करत होत्या; सुषमा अंधारेंचे धक्कादायक आरोप
मुंबई: कॅप्टन अशोक खरात प्रकरणात अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. त्यावर राज्याचे गृहमंत्री या प्रकरणात सक्रिय आहेत ते योग्य ते कारवाई करत आहेत असं शिवसेना (उबाठा गट) नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या की या प्रकरणात अनेक गोष्टींचा उलघडा होणार आहे त्यावरही योग्य कारवाई केली जाण्याची गरज आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात महिलांवर अत्याचार करणारा भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्यात आली होती. महिलेच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी आरोपी खरातला ताब्यात घेतले आहे. यापूर्वी रुपाली ठोंबरे पाटील यांनी खरात आणि चाकणकर यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले होते.
चाकणकर खरात यांच्यात आर्थिक व्यवहार
अंधारे म्हणाल्या, “खरातांचे वडील वारल्यावर तिथे चाकणकर होत्या. खरातांची भाची चाकणकरांच्या घरी राहते. खरात आणि चाकणकर यांच्यात आर्थिक व्यवहार झाले असून त्याची कागदपत्रे मी दोन दिवसांत सादर करीन.”
चाकणकर स्वतः तंत्रविद्या करत होत्या
अंधारे म्हणाल्या, “पीडितेने दिलेल्या माहितीनुसार चाकणकर स्वतः तंत्रविद्या करत होत्या. यासाठी त्यांनी अनामिका म्हणजेच डाव्या/उजव्या हाताच्या करंगळीशेजारचं बोट कापल्याचे पीडितेने सांगितले. अनामिकेचा उपयोग करून विशिष्ट पुजा करत होत्या. ही प्रक्रिया सोमवती अमावस्येला केली जात होती”. अंधारे यांनी पत्रकार परिषदेत चाकणकरांच्या हाताला जखम करून केलेल्या पुजेसंबंधी फोटो देखील दाखवले.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तात्काळ कारवाई होण्याची मागणी ठोंबरे पाटील यांनी केली आहे. त्या सध्या फरार असून पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप आहे. त्यांनी स्पष्ट केले की, योग्य कारवाई न झाल्यास राज्यातील महिलांचा महिला आयोगावरचा विश्वास उडेल.
सुषमा अंधारेंच्या मागण्या:
१. रुपाली चाकणकर यांना ताब्यात घेऊन अटक केली जावी.
२. संबंधित प्रकरणी त्यांची समोरासमोर चौकशी केली जावी.
३. त्यांची नार्कोटिक्स (नार्को) टेस्ट केली जावी.
रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर या सहआरोपी असल्याचा आरोप ठोंबरे पाटील यांनी केला. या प्रकरणाची माहिती असूनही त्यांनी वर्षभरापूर्वी एका पत्रकाराला धमकावून माफीनामा लिहून घेतला होता, असेही ठोंबरे पाटील म्हणाल्या. तसेच, त्यांनी स्वतःच्या लेटरहेडवरून पोलिसांना पत्र दिले होते, असेही त्यांनी सांगितले. जर त्यांनी त्याच वेळी अशोक खरात याच्यावर कारवाई केली असती, तर अनेक महिलांची अब्रू वाचली असती, असेही रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले.