इराण युद्धावर पंतप्रधान मोदींचं महत्त्वाचं भाष्य; पश्चिम आशियाच्या लष्करी संघर्षावर म्हणाले…

इराण युद्धावर पंतप्रधान मोदींचं महत्त्वाचं भाष्य; पश्चिम आशियाच्या लष्करी संघर्षावर म्हणाले…

 

नवी दिल्ली: पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्यात युद्धाचा भडका उडाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत असताना युक्रेन आणि पश्चिम आशियातील सशस्त्र संघर्षावर भाष्य केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “कायद्याचे राज्य, संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीवर भारत विश्वास ठेवतो. लष्करी संघर्ष हा कोणत्याही समस्येवरचा तोडगा नाही.”

भारत आणि फिनलंड हे कायद्याचे राज्य, संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवतात. केवळ लष्करी संघर्ष कोणताही प्रश्न सोडवू शकत नाही. यावर फिनलंड आणि भारताचे एकमत आहे. मग तो युक्रेनमधील संघर्ष असो किंवा पश्चिम आशियातील संघर्ष असो. हा संघर्ष लवकरात लवकर संपून शांतता प्रस्थापित व्हावी, अशी कामना आम्ही करतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

“फिनलंडबरोबर यावर्षी आम्ही भारतात वर्ल्ड सर्क्युलर इकॉनॉमी फोरमचे आयोजन करत आहोत. यामुळे आमच्या शाश्वततेच्या प्रयत्नांना नवी गती आणि कल्पना प्राप्त होईल. वाढत्या जागतिक आव्हानांना तोंद देण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारण करणे केवळ आवश्यकच नाही तर तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाला मुळापासून उखडून फेकण्याबद्दल आमचे एकमत आहे”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले?

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब म्हणाले, “आज आम्ही सुरक्षा विषयावर चर्चा केली. सध्या पश्चिम आशिया आणि युक्रेन याठिकाणी संघर्ष पेटला आहे. आमच्याबाबत बोलायचे झाल्यास रशियाची युक्रेनविरोधातील आक्रमकता बराच काळ टिकली आहे. रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्ष होत आली आहेत. हे युद्ध संपुष्टात येणे हेच सर्वांच्या हिताचे आहे.”

३ मार्च रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. यानंतर भारताने पश्चिम आशियातील परिस्थितीचा उल्लेख करत इराण आणि आखाती प्रदेशातील संघर्ष असा केला होता. या संघर्षात अनेक लोकांचे जीव गेले आहेत आणि आम्ही त्याबद्दल दुःख व्यक्त करतो, असे भारताने म्हटले होते.