कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!

कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!

 


कल्याण : काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार शनिवारी घडला. कल्याण पूर्वेकडील कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या नाश्त्यावरून हा वाद झाला होता. 

 संघटन सृजन अभियानांतर्गत बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी नाश्त्यावरून कुलकर्णी यांना पातकर यांनी शिवीगाळ केली. तेव्हा कुलकर्णी तेथे नव्हत्या, मात्र महिला कार्यकर्त्यांनी हा प्रकार कुलकर्णी यांना सांगितला. त्यानंतर पातकर यांना जाब विचारला; परंतु त्यांनी उद्धट उत्तर दिल्याने कुलकर्णी यांनी त्यांच्या कानशिलात लगावल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. 

पातकर यांनी अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या. ही बाब मला महिला कार्यकर्त्यांनी सांगितली. याबाबत मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पुन्हा उद्धट भाषा वापरली.  त्यामुळे मी त्यांच्या कानशिलात लगावली. मला याबाबत कोणतीही खंत नाही. 

-कांचन कुलकर्णी,  नगरसेविका, काँग्रेस.

बदनामीचा आरोप 

कुलकर्णी वाद घडल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला. पातकर यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे सांगितले. तर, थोडा वाद झाला, बाचाबाची झाली, असे पातकर म्हणाले. विरोधक माझी नाहक बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.