कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता, काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता, काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा

 

मुंबई: पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर कर्नाटक ते मन्नारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान केंद्राकडून बाहेरच्या दिशेने वाहणारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. सोमवारी वर्धा जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहून, तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मुंबईकरांना दिलासा

मागील आठवडाभरापासून उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पाच दिवस पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे. त्यातच पुढील दोन दिवस मुंबईत पावसाची अधिक शक्यता वर्तवली आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारी मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

कोकणात पावसाचा जोर

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पुढील ४८ तास पावसाळी वातावरण राहणार आहे. मुंबईच्या तुलनेत दक्षिण कोकणात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा आणि काजू बा गा यतदारांची चिंता वाढली आहे.

पुण्यातील तापमान ४१ अंशांवर

पुणे शहरातील उन्हाचा चटका आणखी वाढला आहे. रविवारी यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच कमाल तापमानाने ४१ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात होते.

विदर्भात उन्हाचा कहर सुरूच असून,

रविवारी पुन्हा कमाल तापमानात वाढ झाली आहे. नागपूरच्या पाऱ्याने या मोसमातील उच्चांकी ४४.४ अंशांपर्यंत झेप घेतली, तर अकोला आणि वर्ध्याचे तापमान ४५ अंशांवर - पोहोचले आहे. सोमवारपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यामुळे वैदर्भीयांना दोन-तीन दिवस उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळण्याचा अंदाज आहे.