आमदार संजय गायकवाडांची प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी, महाराष्ट्रात उमटले तीव्र पडसाद

आमदार संजय गायकवाडांची प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी, महाराष्ट्रात उमटले तीव्र पडसाद

 

मुंबई: आमदार निवासातील कँटीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे वादात सापडल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. शिवाजी कोण होता? या दिवगंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी संजय गायकवाड यांनी दिल्याचा आरोप केला जात आहे. १९८८ मध्ये लिहलेल्या या पुस्तकाचा आमदार गायकवाड यांना अचानक साक्षात्कार झाला असून, त्यांनी प्रकाशकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन धमकी दिल्याने सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासह त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

आमदार संजय गायकवाडांची प्रकाशकाला शिवीगाळ, धमकीचा आरोप

आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करुन अश्लील शिवीगाळ केली, याचा कथित ऑडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण? असे म्हणत गायकवाड आंबी यांना घरात घुसून मारीन, चिरडून टाकण्याची आणि जीभ कापून टाकण्याची धमकी या ऑडीत देत आहेत. तसेच, पानसरेंचे काय झाले? माहिती आहे ना? असाही इशारा दिला. गायकवाड आणि आंबी यांचा समोर आलेल्या कथित ऑडीओत त्यांना अत्यंत अश्लील शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. गायकवाड आंबी यांनी तू ब्राम्हण आहेस का? असे विचारत असल्याचे या ऑडीओतून समोर आले आहे.

काँग्रेसकडून निषेध, टीका

याप्रकरणी काँग्रेस नेत्या संगिता तिवारी यांनी आमदार गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “संजय गायकवाड डोक्यावर पडलेत का त्यांच्या मेंदूला लकवा मारला आहे का. प्रत्येक ठिकाणी दादागिरी प्रत्येक ठिकाणी शिवीगाळ, जीभ कापून टाकेन, वरती पाठवेन अशी भाषा वापरतात. ही काय मोगलाई आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुम्ही एक भागाचे आमदार आहात, वरिष्ठांनी गायकवाडांचे शिक्षण घ्यावं. हा माणूस कधीतरी भयानक प्रकार करेल आणि महाराष्ट्राला काळीमा फासतील”, असे काँग्रेस नेत्या संगिता तिवारी म्हणाल्या.

हर्षवर्धन सपकाळांची कारवाईची मागणी

“राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघीतली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये, कारण ती लायकी यांची नाही”, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गायकवाडांवर केली. “पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी देताना ‘पानसरे चे जे हाल केले, ते करण्याची’ म्हणजे थेट खुनाची धमकी देण्यात आली आहे”. प्रकाशक प्रशांत आंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा देण्याची मागणी सपकाळ यांनी केली. तसेच, “कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या आमदाराचा देखील सहभाग आहे का? याची चौकशी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी”, अशी मागणी त्यांनी केली.

रोहिणी खडसेंकडून समाचार

“दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल ३७ वर्षांपूर्वी लिहलेल्या ‘शिवाजी कोण होता’, या पुस्तकाच्या शीर्षकाबाबत गायकवाड यांना अचानक साक्षात्कार झाला आहे. त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गायकवाड यांच्याकडून आपण अपेक्षा तरी काय करू शकतो ? वाचन आणि त्यांचा काही दूर दूरपर्यंत काही संबंध असेल याची शक्यता कमीच आहे. पण समाजात वितुष्ट निर्माण करण्यात, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांनी पीएचडी घेतली आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या (शरद पवार) नेत्या रोहिणी खडसे यांनी आमदार गायकवाड यांच्यावर टीका केली.

“गायकवाड यांनी या पुस्तकावर आक्षेप घेतला असेल तर त्यांना शिवाजी महाराज कळालेच नाहीत. पुस्तकाच्या नावावर न जात त्यात काय लिहलं आहे ते पाहावं”, असे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले.

वकील सरोदेंचे गायकवाडांना आव्हान

याप्रकरणी वकील असीम सरोदे यांनी देखील प्रतिक्रिया देताना, बुलढाण्यात लवकरच ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकांचे जाहीर वाचन करणा असल्याचे जाहीर केले. संजय गायकवाड काय करतो बघूया?, असे आव्हान देखील त्यांना दिले आहे. दरम्यान, प्रकाशक आंबी यांंच्याशी बोलणं झालं असून, ते पोलिस तक्रार करणार असल्याचेही सरोदे यांनी सांगितले.

भाजपाने मांडली भूमिका

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द कुणीही वापरु नये, त्यांचा अपमान करण्याचे धाडस कोणी करु नये, अशी प्रतिक्रिया भाजापाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी माध्यमांना दिली आहे. तर, “शिवाजी कोण होता हे पुस्तक गोविंद पानसरे यांनी लिहले आहे. गायकवाडांनी उगाच जुन्या विषयांत जाऊ नये”, असे भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

आमदार संजय गायकवाडांचे स्पष्टीकरण

आमदार संजय गायकवाड यांनी या विषयावर स्पष्टीकरण देताना, व्हायरल होणारी कथित ऑडीओ मोडतोड करुन प्रसिद्ध केल्याचे सांगितले. शिवाजी कोण होता? या पुस्तकात शिवरायांचा विकृत आणि चुकीचा इतिहास देण्यात आल्याचा त्यांनी सांगितले. आंबी यांच्याशी बोलताना ब्राम्हण हा मुद्दा त्यांनीच (आंबी) उपस्थित केला, असाही दावा त्यांनी केला. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांची जीभ हासडलीच पाहिजे असे गायकवाड म्हणाले. अशा प्रकारची पुस्तकं आम्ही खपवून घेणार नाही, असेही गायकवाड स्पष्टीकरण देताना म्हणाले.

प्रकाशक प्रशांत आंबी यांनी मांडली बाजू

“आमदार संजय गायकवाड यांचा मध्यरात्री १२.५१ वाजता फोन आला होता. नऊ मिनिटांच्या फोन कॉलमध्ये आमदार गायकवाड वारंवार शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत होते. पुस्तक वाचण्यास त्यांना सांगितले पण त्यांना त्याचा रुची नव्हती असे दिसून आले. १९८८ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तकाच्या शिर्षकाबाबत त्यांनी ३८ वर्षांनंतर आक्षेप घेतला आहे. गायकवाड कदाचित दारुच्या नशेत असावेत आणि त्यांनी त्या नशेत शिवाजी महाराज यांचा देखील अनादर केला,” असा आरोप आंबी यांनी केला. फोनवर संजय गायकवाडच फोनवर असल्याचे आम्ही आमच्या पातळीवर पुष्टी केल्याचेही आंबी म्हणाले. अशा धमक्यांना घाबरत नसल्याचे सांगताना आंबी यांनी गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले.

गोविंद पानसरे यांच्या सून मेघा पानसरे काय म्हणाल्या?

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांच्यावर टीका केली. “आमदार संजय गायकवाड यांनी वापरलेली भाषा, केलेली शिवीगाळ, धमक्या या सर्वाचा निषेध करते. छत्रपती शिवाजी महाराज सौजन्यशील, न्यायप्रिय आणि गोरगरिबांचा रयतेचा राजा म्हणून ओळखले जातात. त्यांचा वारसा सांगत, त्यांचं नाव घेत या पद्धतीची भाषा करणारे कोणता वारसा पुढे नेत आहेत हा प्रश्न माझ्यासमोर आहे. संजय गायकवाडांनी ते पुस्तक वाचलंय असं दिसत नाही. केवळ टायटल बघून त्यांनी अशी भाषा केलीय. माझं त्यांना आवाहन आहे की त्यांनी पुस्तक वाचावं, त्याच्यात कोणते शिवाजी महाराज सांगितले आहेत ते बघावं आणि मग स्वतःचं विधान तपासून घ्यावं”, असे मेघा पानसरे म्हणाल्या.