भोंदू बाबा अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं निधन

भोंदू बाबा अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं निधन

 

वैजापूर - समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात भोंदू बाबा अशोक खरात याचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला आहे. ते संभाजी नगरहून शिर्डीला जात असताना समृध्दी महामार्गावरती त्यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती आहे.

कारची कंटेनरला पाठीमागून धडक

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना धोत्रे गावाजवळ शेळके यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक दिली असल्याची माहिती आहे. कार थेट कंटेनरखाली घुसली आहे. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात जिंतेद्र शेळकेंचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी

या अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शेळके यांची पत्नी बराच वेळ गाडीतच अडकून पडल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दोघांवरही सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

खरातचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी

भोंदू बाबा अशोक खरात याचे जितेंद्र शेळके यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध होते. खरात याच्या 'शिवनिका ट्रस्ट'चे ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. याशिवाय, शेळके यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरात याची भागीदारी असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके मोठ्या मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती समोर येत आहे.