म्हाडा पुणे मंडळाच्या २९५ घरांच्या विक्रीसाठी ४ मे २०२६ पासून ऑनलाइन नोंदणी
शुक्रवार, २४ एप्रिल, २०२६
Edit
मुंबई: म्हाडाच्या २९५ घरांच्या विक्रीसाठीची ऑनलाइन अर्ज नोंदणी ४ मे
रोजी सकाळी ११.३० पासून सुरु होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
या तत्त्वावर पुणे येथील ही घरे विकली जाणार असून, यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येईल.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार अर्जदारांना उपलब्ध सदनिकांमधून तत्काळ निवड करण्याची सुविधा असेल. सदनिका निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत अर्जदाराने सदनिकेच्या विक्री किंमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा करणे आवश्यक आहे. ही रक्कम म्हाडाकडे प्राप्त झाल्याची खात्री झाल्यानंतरच अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने सदनिकेची रक्कम भरून घेण्यासाठी तात्पुरते देकार पत्र देण्यात येईल.
निर्धारित कालावधीत भरणा न केल्यास संबंधित सदनिकेवरील हक्क आपोआप रद्द
होऊन ती पुढील अर्जदारासाठी उपलब्ध होईल. अनामत रकमेचा परतावा केवळ
नियमांनुसारच करण्यात येईल. त्यावर व्याज देण्यात येणार नाही.
म्हाडाच्या पुणे
मंडळामार्फत २० टक्के सर्वसमावेशक व १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण
योजनांतील विक्री अभावी शिल्लक राहिलेल्या २९५ घरांचा प्रथम येणाऱ्यास
प्रथम प्राधान्य या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. पुणे महापालिका
म्हाडा योजनेंतर्गत ११३ घरे व पिंपरी चिंचवड म्हाडा योजनेंतर्गत १८२ घरे
याचा यात समावेश आहे.
कोणत्या प्रकल्पातील घरे ?
चिखली,
ताथवडे, वाकड, लोहगाव, मुंढवा, येवलेवाडी, वाघोली, किवळे, फुरसुंगी,
डुडुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर, पुनावळे आदी परिसरांतील प्रकल्पांचा या
योजनेत समावेश आहे.
पर्याय निवडण्याची संधी
वन
रूम किचन, वन बीएचके आणि टू बीएचके प्रकारातील घरे आहेत. विविध
प्रकल्पांमध्ये भिन्न क्षेत्रफळ, किंमत व सुविधा उपलब्ध असल्याने
अर्जदारांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे.
अनामत रक्कम...
अल्प उत्पन्न गट तसेच आर्थिक दुर्बल घटक अर्जदारांसाठी अनामत रक्कम - २० हजार रुपये
अर्ज फी - ६०० रुपये
जीएसटी - १०८ रुपये
अर्जाच्या वेळी एकूण प्रारंभिक भरणा - २०,७०८ रुपये
अर्ज करतानाच्या अटी...
- अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा किंवा मागील २० वर्षांपैकी किमान १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्यास असावा.
- आर्थिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा (आयकर विवरणपत्र किंवा तहसीलदार दाखला) सादर करणे बंधनकारक राहील.
- अर्ज करताना अर्जदाराने बँक खात्याचा क्रमांक व आयएफएससी कोड नमूद करणे आवश्यक आहे.
सर्व
पत्रव्यवहार ई-मेल, एसएमएस व अर्जदाराच्या लॉगिनद्वारेच करण्यात येणार
असल्यामुळे अर्जदारांनी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अचूक व सक्रिय ठेवणे
आवश्यक आहे.