बीडच्या जेलमधून वाल्मिक कराडच्या संदर्भातील नवीन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
बीड: बीडच्या जेलमधून एकामागून एक कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल होत होत आहेत. यावरुन बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगची दहशत सुरु असल्याचा संशय निर्माण होतोय. जेलमध्ये असलेल्या सनी आठवलेची नवीनच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात तो कराड आणि त्याच्या गँगवर गंभीर आरोप करतोय.
सलग दोन दिवस अझहर पठाण नामक कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. पहिल्या रेकॉर्डिंगमध्ये त्याने वाल्मिक कराडच्या गँगकडून अमानुष मारहाण झाल्याचं सांगितलं होतं. तर दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराडला बदनाम करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, म्हणून मी तसं बोललो असं तो म्हणतोय.
यानंतर आता बीड कारागृहातच कैदी असलेल्या सनी आठवले याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. त्याने कराडचा जेलमध्ये दबदबा आहे, तो अझहर पठाणवर दबाव आणत आहे, पठाणला खरंच मारहाण झालीय.. त्याचा खुबा उपसला होता, असं आठवले सांगतोय. यासंदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्याने केलीय.
काय म्हणतोय सनी आठवले?
कॉल रेकॉर्डिंगमध्ये सनी आठवले म्हणतोय की, अझहर पठाणला मारहाण झाली होती, त्याचे सगळे स्टेटमेंट बदलले आहेत. बंदी झालेली असताना रात्री साडेआठ वाजता वाल्मिक कराड याला बाहेर काढून त्याचा जबाब घेतला आहे. त्यानंतर त्याला रात्री 9 वाजता बराक क्रमांक तीनमध्ये आणून टाकले.
आठवले पुढे सांगतोय की, सगळे अधिकारी अझहर पठाणवर दबाव आणत आहेत, दहा हजार रुपयांची कॅन्टीन देतो, बाहेर तुला पैसे देतो, असं अमिष वाल्मिक कराडने दिलंय. जर त्याने ती चिठ्ठी लिहिली तर ती बाहेर कोणी आणली याची चौकशी व्हायला पाहिजे. कराडने आणि त्याच्या गँगने खोटे गुन्हे दाखल केले आणि असेच लोकं मारलेले आहेत. ते आता माझ्या जेल बदलीच्या मागे लागलेले आहेत.
बाहेरच्या पथकाकडून झडती घ्या?
सनी आठवले कॉल रेकॉर्डिंगमध्ये शेवटी म्हणतोय की, बाहेरच्या पथकाने जेलमध्ये येऊन झेडती घ्यायला पाहिजे. त्याच्याकडे किती आणि कोणाच्या नावावर सिम कार्ड आहेत, ते मला माहित आहे. त्याला कोण कॅन्टीन देतो, कोण पैसे देतो आणि कोण पैसे घेतं हे सगळं मला माहित आहे. सगळं जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर चालतंय.. असा गंभीर आरोप आठवलेने केला.
वाल्मिक कराडला जेलमध्ये डीशटीव्ही
''कराडला जेलमध्ये नवीन डीशटीव्ही दिला आहे. त्याला इथे सगळी व्हीआयपी सुविधा मिळतेय. अंजलीताई दमानिया आणि सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी याची चौकशी लावावी.'' अशी मागणी सनी आठवलेने कॉल रेकॉर्डिंगमध्ये केली आहे.