सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका? बीडमधील इसमाची अशोक खरात प्रकरणातील एसआयटी कडे तक्रार

सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका? बीडमधील इसमाची अशोक खरात प्रकरणातील एसआयटी कडे तक्रार

 


राज्यात गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरातच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडे  बीडमधील  एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली आहे.

 या तक्रारीनुसार, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचे म्हटले आहे. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारीत काय आहे नेमका दावा?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील एका इसमाने थेट एसआयटी कडे धाव घेत ही तक्रार नोंदवली आहे. अशोक खरात प्रकरणाशी संबंधित धागेदोरे तपासले जात असताना, या तक्रारीने तपासाची दिशा अधिक गुंतागुंतीची केली आहे.

रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा या तक्रारदाराने केला आहे. तक्रारीत तथ्य किती आणि खोडसाळपणा किती, याचा शोध एसआयटी घेणार आहे. राजकीय आकसातून ही तक्रार करण्यात आली आहे का? या अंगानेही पोलीस तपास होण्याची शक्यता आहे.

हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊस

अशोक खरात प्रकरणात फसवणूक झालेल्या महिला आणि इतर पीडितांसाठी एसआयटी ने हेल्पलाईन क्रमांक आणि इतर माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत. या माध्यमातून दररोज विविध प्रकारच्या तक्रारींचा ओघ सुरू आहे. यामध्ये केवळ आर्थिक फसवणूक किंवा लैंगिक शोषणाचेच गुन्हे नाहीत, तर अनेक कौटुंबिक वादा संदर्भात देखील तक्रारी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणाचा मुख्य तपास करत असतानाच, दररोज येणाऱ्या या शेकडो तक्रारींची सत्यता पडताळून पाहणे हे SIT समोर मोठे आव्हान ठरत आहे.

इतरांचे भविष्य सांगणाऱ्या अशोक खरातला स्वतःचे भवितव्य कळेना!

दरम्यान, इतरांचे भविष्य सांगणारा भोंदू अशोक खरात स्वतःच्या भवितव्याबाबतच अंधारात असल्याचे चित्र समोर आले आहे. चौकशीदरम्यान 'मी इथून बाहेर पडेल असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे,' अशी प्रतिक्रिया खरातने दिल्याची माहिती आहे. खरातविरोधात आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले असून तिसऱ्या गुन्ह्यात सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीत फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याचीही माहिती समोर येत आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. तसेच आर्थिक गैरव्यवहार आणि महिलांची फसवणूक केल्याचे प्रकारही उघड झाले आहेत. एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.