नीरा कालव्यात बहीण-भावाचा मृतदेह; फलटणमधून मंगळवारी झाले होते बेपत्ता
फलटण शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेखळी (ता. बारामती, जि. पुणे) येथील किरण काकासाहेब चोपडे (वय २६) व काजल काकासाहेब चोपडे (वय २३) हे दोघे बहीण- भाऊ दुचाकीवरून फलटण येथे एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बहीण काजलच्या तिसऱ्या वर्षातील प्रोजेक्टसंदर्भात माहिती घेऊन प्रोजेक्ट असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करा म्हणून सांगण्यासाठी संबंधित शिक्षकाकडे आले होते.
त्यानंतर कॉलेजमधील काम पूर्ण करून ते घरी पोचलेच नाहीत. हे त्यांच्या आई- वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी व नातेवाइकांनी फलटण शहर पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. त्यानुसार फलटण शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता म्हणून तक्रार नोंद करण्यात आली.
दरम्यान, आज सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ते गुरसाळे हद्दीत या दोघा बहीण-भावाचे मृतदेह नीरा उजवा कालव्यात मिळून आले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नातेपुते ग्रामीण पोलिसांनी ते मृतदेह बाहेर काढले व त्यांचा पंचनामा करून नातेपुते ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
त्यानंतर अंत्यविधीसाठी ते मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची नोंद नातेपुते ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मित मृत म्हणून करण्यात आली आहे, तसेच नातेपुते ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जावेद जमादार हे तपास करीत आहेत.