सुनेत्रा पवार सोमवारी विधानसभेसाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज , इतिहासाची होणार पुनरावृत्ती

सुनेत्रा पवार सोमवारी विधानसभेसाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज , इतिहासाची होणार पुनरावृत्ती

 


बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी (ता. 6) बारामती विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून सोमवार (ता. 6) ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्यात आमदार व्हावे लागते. त्या मुळे अजित पवार यांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे. त्या नुसार सुनेत्रा पवार सोमवारी अर्ज दाखल करत आहेत. राष्ट्रवादीचे बहुसंख्य मंत्री, आमदार, पदाधिकारी, पवार कुटुंबिय या प्रसंगी उपस्थित असतील.

पवार कुटुंबियांच्या परंपरेनुसार सकाळी श्री क्षेत्र कण्हेरी येथील मारुतरायाचे दर्शन घेत त्या विद्या प्रतिष्ठानवरील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी वंदन करण्यासाठी जाणार आहेत. तेथून बारामतीतील कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या व त्या नुंतर इंदापूर रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकस्थळी त्या अभिवादन करतील. त्या नंतर साडेदहा वाजता कविवर्य मोरोपंत सभागृहात मेळावा होणार असून तेथे त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. तेथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय भवन येथे जाणार आहे.