बारामती येथे आज जय पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची आढावा बैठक

बारामती येथे आज जय पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची आढावा बैठक

 

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र जय पवार हे सक्रिय राजकारणात सक्रिय होत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील समावेशानंतर ते आज शनिवार दि. ४ एप्रिल रोजी बारामतीत पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ते कार्यकर्त्यांकडून निवडणुकीचा आणि पक्ष संघटनेच्या कामकाजाचाही आढावा घेणार आहेत. पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द सुरू होत असल्याने ते कशा पद्धतीने कामकाज करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदासह पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. याच दरम्यान, जय पवार यांचाही पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाला आहे. दरम्यानच्या काळात बारामतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दि. ६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तत्पूर्वी जय पवार यांच्या उपस्थितीत आज शनिवारी दि. ४ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता बारामती येथील राष्ट्रवादी भवनात आढावा बैठक होणार आहे.

अजितदादा हयात असताना जय पवार यांनी विविध निवडणुकांमधील प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी आपल्या शैलीद्वारे युवकांचं मोठं जाळं निर्माण केलं आहे. अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांचा पक्षाच्या कार्यकारिणीत समावेश झाल्यामुळे ते सक्रिय राजकारणात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्या बारामती शहर आणि तालुका राष्ट्रवादीच्या वतीने जय पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या आढावा बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

उद्या होत असलेल्या या बैठकीत जय पवार हे निवडणुकीसह पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर उपस्थित कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहेत. या बैठकीला शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन तालुकाध्यक्ष संदीप बांदल आणि शहराध्यक्ष किरण इंगळे यांनी केलं आहे.

दरम्यान, दि. २३ एप्रिल रोजी बारामतीची पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी अनेकांनी आपले अर्ज दाखल केले असून ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. त्यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचीही उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक एकतर्फी होणार असली तरी लक्षवेधी ठरणार आहे.