शॅम्पू, औषधं ते दुधाची पिशवी, कस्टम ड्युटी हटवली, 'या' ४१ वस्तू स्वस्त, पाहा संपूर्ण यादी

शॅम्पू, औषधं ते दुधाची पिशवी, कस्टम ड्युटी हटवली, 'या' ४१ वस्तू स्वस्त, पाहा संपूर्ण यादी

 


नवी दिल्ली: अमेरिका-इस्रायलनं इराणवर लादलेल्या युद्धाचे परिणाम जगावर दिसू लागले आहेत. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीमधून जलवाहतूक बंद केल्यानं जगभरातील इंधन पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम झाला आहे.

अशातच इंधन दरवाढही झाली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींनी १२२ डॉलर प्रति बॅरलचा उच्चांक गाठला आहे. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसू नये, म्हणून केंद्र सरकारने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने ४१ जीवनावश्यक पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील 'कस्टम ड्युटी' (आयात शुल्क) पूर्णपणे रद्द केली आहे.

काय स्वस्त होणार?


अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २ एप्रिल २०२६ पासून ते ३० जून २०२६ पर्यंत ही सवलत लागू राहणार आहे. पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील आयात शुल्क हटवल्यामुळे प्लास्टिक, पॅकेजिंग, कापड (टेक्सटाइल), औषधे (फार्मा), केमिकल्स आणि ऑटोमोबाईल पार्ट्स स्वस्त होण्यास मदत होईल. याचा थेट परिणाम रोजच्या वापरातील वस्तू जसे की शॅम्पू, डिटर्जंट, औषधे आणि प्लास्टिकच्या वस्तूंच्या किमतींवर होणार असून, महागाईपासून जनतेला दिलासा मिळणार आहे.

इंधनाच्या दरातही दिलासा:


कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे आल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीती होती. मात्र, सरकारने यापूर्वीच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) १० रुपये प्रति लीटरची कपात केली आहे. आता पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील शुल्कात कपात केल्याने घरगुती उद्योगांना कच्चा माल स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे.

जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम:


'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (Strait of Hormuz) मधील तणावामुळे जहाजांची ये-जा विस्कळीत झाली आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर (Supply Chain) परिणाम झाला असून अनेक देशांत गॅस आणि इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा संकटाच्या काळात भारतीय बाजारपेठेतील किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने मेथेनॉल, फिनॉल, ॲसिटिक ॲसिड, पीव्हीसी (PVC) आणि पॉलिथीनसह ४० महत्त्वाच्या वस्तूंना कस्टम फ्री केले आहे.

या ४० वस्तूंना सीमा शुल्कातून सूट


सरकारने सीमा शुल्कातून सूट दिलेल्या ४० वस्तूंमध्ये मिथेनॉल, टोल्युइन, स्टायरिन, विनाइल क्लोराइड मोनोमर, मोनोइथिलीन ग्लायकॉल (एमईजी), फिनॉल, ऍसिटिक ऍसिड, प्युरिफाइड टेरेफ्थॅलिक ऍसिड (पीटीए), पॉलिथिलीन, पॉलिप्रोपिलीन, पॉलिस्टायरिन, पॉलिविनाइल क्लोराइड (पीव्हीसी), पॉलिथिलीन टेरेफ्थॅलेट (पीईटी) आणि ऍक्रिलोनायट्राइल-ब्युटाडाइन-स्टायरिन (एबीएस) व पॉलिकार्बोनेट यांसारख्या अभियांत्रिकी प्लॅस्टिकचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने ३० जूनपर्यंत सीमा शुल्काशिवाय आयात केली जाऊ शकतात.

>> कोणत्या वस्तूंपासून काय तयार होतं?


> मिथेनॉलचा वापर प्लायवूड, इन्सुलेशन फोम, ऍसिटिक ऍसिड, प्लॅस्टिक्स, कृत्रिम तंतू, रंग, लेप आणि औषधनिर्मितीमध्ये होतो.

> टोल्युइनचा वापर रंग, थिनर्स, चिकट पदार्थ, छपाईची शाई, पेंट रिमूव्हर्स, रबर, रेझिन्स आणि प्लॅस्टिक्सच्या निर्मितीसाठी होतो. इन्सुलेशन फोमचा उपयोग टीव्ही, संगणक आणि मोबाईल फोनच्या आवरणांमध्ये, तसेच खेळणी आणि वाहनांच्या भागांमध्ये होतो.

> पॉलिस्टीरिनचा वापर डिस्पोजेबल प्लेट्स, कप, अन्नाची भांडी, अंड्यांचे ट्रे आणि आईस्क्रीम कप तयार करण्यासाठी होतो.

> विनाइल क्लोराइड मोनोमरचा वापर रक्ताच्या पिशव्या, वैद्यकीय नळ्या, खेळणी आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या वस्तू बनवण्यासाठी होतो.

> मोनोइथिलीन ग्लायकॉलचा वापर पाण्याच्या बाटल्या, शीतपेयांच्या बाटल्या, शॅम्पू आणि तेलाच्या बाटल्या आणि कपड्यांच्या निर्मितीमध्ये होतो.

पॉलिथिलीनचा वापर दुधाच्या आणि ज्यूसच्या बाटल्या, पाण्याच्या नळ्या, खरेदीच्या पिशव्या, प्लास्टिकच्या पिशव्या, खाद्यपदार्थांचे वेष्टण, सँडविचच्या पिशव्या, एकदाच वापरता येणारे हातमोजे आणि तत्सम वस्तू बनवण्यासाठी केला जातो.