बारामती येथे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ; वैद्यकीय अधिकाऱ्याला डॉक्टरकडून धमकी

बारामती येथे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ; वैद्यकीय अधिकाऱ्याला डॉक्टरकडून धमकी

 

बारामती: बारामती शहरात वैद्यकीय क्षेत्रात चिंतेची बाब समोर आली आहे.एका वैद्यकीय अधिकाऱ्याला एका डॉक्टरकडून धमकी दिल्याची चर्चा बारामतीत चांगलीच रंगली असून या प्रकारामुळे संपूर्ण वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,काही दिवसांपूर्वी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने एका डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला होता.या कारवाईमुळे संतप्त झालेल्या डॉक्टरने अधिकाऱ्याला जाब विचारत अधिकारी हजर असतात का?असा प्रश्न केलेला व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

असा सवाल करत संबंधित डॉक्टरने अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला,अशी माहिती पुढे आली आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आल्याची चर्चा असून त्यामध्ये संबंधित डॉक्टर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या उपस्थितीबाबत चौकशी करताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.यामुळे हा प्रकार केवळ वादापुरता मर्यादित नसून, अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.

तसेच,संबंधित डॉक्टर राजकीय दबावाचा वापर करून वैद्यकीय अधिकाऱ्याला जाब विचारत असल्याचेही आरोप करण्यात येत आहेत.या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील काही व्यक्तींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान,या घटनेमुळे बारामतीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अशा प्रकारच्या घटना वाढल्यास प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने योग्य ती पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.