अशोक खरात प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी; सीडीआर प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

अशोक खरात प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी; सीडीआर प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

 

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे वळण आले असून, या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. ५) नाशकात दिली. या प्रकरणाचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) थेट खासगी व्यक्तीपर्यंत कसे पोहोचले, याबाबतही सखोल चौकशीचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

फोन कॉल्स कोणी केले यापेक्षा खरातच्या प्रकरणांमध्ये कोणाचा थेट संबंध असल्याचे कॉलमधून स्पष्ट झाले तर त्याची चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले. पोलिस व इतर तपास यंत्रणा या प्रकरणातील सर्व पैलू तपासत असून, सीडीआर लीक कसा झाला, कोणत्या स्तरावरून माहिती बाहेर गेली आणि त्याचा कोणाला फायदा झाला, याचा माग काढण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून, यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. तपासाशी संबंधित अशोक खरातचे सीडीआर काही राजकीय व्यक्तींपर्यंत पोहोचल्याचे समोर आल्याने त्याची चाैकशी करण्यात येईल असे ते म्हणाले. दरम्यान, सरकारच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी टीका केली आहे.

खरातचे आर्थिक व्यवहार, गैरव्यवहार किंवा मनी लाँड्रिंगसारखे कोणतेही धागेदोरे आढळल्यास त्यावरही कारवाई केली जाईल. 
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री