बारामती येथे अल्पवयीन मुलीवर चॉकलेटचे आमिष दाखवत अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
बारामती: बारामती शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका १० वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली बारामती शहर पोलिसांनी एका ५२ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वीही अशाच प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात १० वर्षांची शिक्षा भोगली असल्याचं समोर आलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी हसन शमशुद्धीन झारे उर्फ राजू (वय ५२, रा. अनंतआशा नगर) हा पीडित बालिकेच्या शेजारीच वास्तव्यास होता. पीडित कुटुंबाशी त्याची जुनी ओळख होती. याच ओळखीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. घरात कोणीही नसताना त्याने बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच, या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने बालिकेला दिली.
मुलीने या प्रकाराबाबत आपल्या पालकांना माहिती दिल्यानंतर पालकांनी तातडीने बारामती शहर पोलिस ठाणे गाठले. पालकांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी हसन झारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५, ३५२ आणि बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो/POCSO) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
दरम्यान, तपासादरम्यान आरोपीचा अत्यंत गंभीर गुन्हेगारी इतिहास उघड झाला आहे. या आरोपीने २००९ मध्ये एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोषी ठरवून १० वर्षांची सक्तमजुरी सुनावली होती. १० वर्षांची दीर्घ शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतरही आरोपीच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. त्याने पुन्हा एका निष्पाप बालिकेला लक्ष्य केल्यानं तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.
पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.