एसटी चे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि परिवहन खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘ रस्ता सुरक्षा अभियाना 'च्या जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा करार हस्तांतरण सोहळा बुधवार दि. २२ एप्रिल २०२६ रोजी मंत्रालयात पार पडला. हा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख ST महामंडळाचे ब्रँड अँबेसेडर
एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती मोहिमांना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे, तसेच परिवहन खात्याच्या ‘ रस्ता सुरक्षा अभियाना 'ची जनजागृती अधिक परिणामकारक करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. विशेषतः रस्ता सुरक्षा, प्रवासी जनजागृती आणि सामाजिक संदेशांच्या प्रसारासाठी या दोन्ही कलाकारांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख एसटीचे ब्रँड अँबेसेडर होणार असल्याचे समजताच सोशल मीडियावर याबाबत चर्चा असल्याचे म्हटले जात आहे. याआधी मकरंद अनासपुरे आणि दिवंगत विक्रम गोखले यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या माध्यमातून एसटीला एक वेगळी ओळख मिळाली होती. सन २०२३ मध्ये मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान, आताच्या घडीला राजा शिवाजी या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख चर्चेत आहेत. 'राजा शिवाजी' हा सिनेमा रितेश देशमुख आणि जिनेलिया यांच्यासाठी अनेक कारणांमुळे खास ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. या सिनेमात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकणार आहे.