लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात

लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात

 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला नव्हता त्यामुळे हा लाभ नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत होता.

 पण आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

राज्य सरकारकडून डीबीटीद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. अनेक महिलांना आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज सुद्धा येऊ लागले आहेत. मार्च, एप्रिल आणि मे अशा तीन महिन्यांपासून लाभ प्रलंबित होता त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न उपस्थित होत होते. पण आता खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने लाडक्या बहिणी आनंदी झाल्या आहेत.

नेमके किती रुपये मिळाले?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल शेवटची तारीख होती. ही शेवटची तारीख पूर्ण झाल्यावर पडताळणीनंतर पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. मार्च, एप्रिल आणि मे अशा तीन महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणींना एकत्रित मिळेल अशी आशा होती. मात्र, प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना केवळ १५०० रुपयांचा लाभ मिळाल्याचे मेसेज येत आहेत. म्हणजेच मार्च महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळाला आहे.

एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?

सरकारकडून मार्च महिन्याचे १५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आहेत. म्हणजेच आता एप्रिल आणि मे अशा दोन महिन्यांचा लाभ प्रलंबित आहे. हा लाभ नेमका कधी मिळणार याबाबत अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

७० लाख बहिणी अपात्र

महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख योजना 'मुख्यमंत्री माझी लडकी बहिण योजने'अंतर्गत राबवलेल्या मोठ्या ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी मोहिमेनंतर जवळपास ७० लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. या निर्णयामुळे दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळवणाऱ्या महिलांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितले की, वारंवार मुदतवाढ देऊन आणि जनजागृती मोहीम राबवूनही, मोठ्या संख्येने लाभार्थी अनिवार्य ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत.

तुमच्या बँक खात्यात आले का पैसै?

  • लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून एसएमएस येईल.
  • बँकेकडून एसएमएस न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर एसएमएस पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल करुन तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता.
  • तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता.
  • डेबिट कार्ड असल्यास एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता.
  • तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासू शकता.