विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा धक्का! ३ मे ची 'नीट' परीक्षा रद्द; आता पुन्हा द्यावी लागणार परीक्षा

विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा धक्का! ३ मे ची 'नीट' परीक्षा रद्द; आता पुन्हा द्यावी लागणार परीक्षा

 


नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) २०२६ ची 'नीट यूजी' परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहेत. भारत सरकारच्या परवानगीनंतर नीट यूजीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा ३ मे २०२६ रोजी घेण्यात आली होती. दुसऱ्यांदा होणाऱ्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नीट'  परीक्षा अखेर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकारांबाबत देशभरात संतापाची लाट होती. या पार्श्वभूमीवर, ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

तपास यंत्रणांच्या अहवालानंतर निर्णय

'एनटीए'ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ८ मे रोजी या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आला होता. या यंत्रणांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि तांत्रिक तपासाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी ही परीक्षा रद्द करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता, केंद्र सरकारने हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे.

विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा

या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांवर फेरपरीक्षेची टांगती तलवार आली असली, तरी (एनटीए) ने एक मोठा दिलासा दिला आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी भरलेले संपूर्ण परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. तसेच, फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणतेही नवीन शुल्क भरावे लागणार नाही. परीक्षेचा सर्व खर्च एनटीए आपल्या अंतर्गत संसाधनांतून करणार आहे. ज्या उमेदवारांनी मे २०२६ च्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यांची तीच माहिती ग्राह्य धरली जाईल आणि त्यांना नवीन प्रवेशपत्रे जारी केली जातील.