बारामती तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी माळेगाव सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
रविवार, १७ मे, २०२६
Edit
बारामती: बारामती तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने माळेगाव सहकारी साखर कारखाना लि.यांच्या वतीने विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सभासदांसाठी किफायतशीर खर्चात ऊस उत्पादन वाढीबाबतची ही महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केली आहे.
ही कार्यशाळा बुधवारी २० मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शिवतीर्थ मंगल कार्यालय, शिवनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेमध्ये घरच्या घरी स्वस्तात खते तयार करणे, कृषी जैविक व बुरशीनाशके तयार करण्याचे प्रशिक्षण, तसेच ऊस शेतीमधील उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये जैविक फॉर्म्युलेशन, ट्रायकोडर्मा, अझोटोबॅक्टर, सिलीकोन स्टिकर, बायो एन्झाईम, ऑर्गेनिक कार्बन, मिनरल्स यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
विशेष म्हणजे,ऊस शेतीमधील खर्च कमी करून जमिनीची सुपीकता वाढवत अधिक उत्पादन कसे घ्यावे यावर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीत उपयोगी पडतील अशा तंत्रांचा परिचय करून देत किफायतशीर शेतीचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषीतज्ज्ञ अंकुश पाटील उपस्थित राहणार असून ते ऊस शेतीतील आधुनिक प्रयोग, सेंद्रिय पद्धती आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपाध्यक्षा संगीता कोकरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील तसेच संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यशाळेला जास्तीत जास्त सभासद व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.