विधान परिषदेचा कठीण पेपर सुटला, आता सोपा पेपर बाकी; मुख्यमंत्री फडणवीस यांचे दिल्लीत वक्तव्य
नवी दिल्ली: विधान परिषदेचा आमचा कठीण पेपर पूर्णपणे सुटला आहे. आता फक्त सोपा पेपर बाकी आहे. मुंबईत याबाबतची बैठक होईल आणि हा विषय सोडवू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच अर्थखात्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याकडे कोणतीही मागणी आलेली नाही. ती येईल त्यावेळी मी बोलेन असेही त्यांनी स्पष्ट केले.
कांदा प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत बैठकीसाठी आले होते. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. विधान परिषदेच्या महायुतीच्या जागावाटपाबाबत सध्या उत्सुकता आहे त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले.
अर्थखात्याबाबत मागणी नाही
राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा अर्थखाते मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्याबाबत विचारले असता, अद्याप तरी माझ्यापर्यंत अशी मागणी आलेली नाही. ती जेव्हा येईल तेव्हा मी बोलेन असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अमित शाहांसोबत चर्चा
विधान परिषद तसेच अर्थखात्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती आहे. याबाबत विचारले असता अमित शाह आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना महाराष्ट्रातील घडामोडींबाबत आम्ही अवगत करत असतो. विधान परिषदेबाबत दिल्लीत कोणतीही बैठक नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक लढण्यास उत्सुक असलेल्या ४८ नेत्यांच्या नावांची यादी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या सुपूर्द केली. महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख तीन-चार दिवसांवर आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नितीन नबीन यांची उशीरा रात्री भेट घेतली.