तृणमूलची १५ वर्षांची सत्ता उलथवली, केरलममध्ये डावे सत्ताबाहेर, पाच राज्याच्या निकालानंतर किती राज्यात भाजपाची सत्ता?
पश्चिम बंगालमधील या निकालानंतर आता देशातील तब्बल २२ राज्यांमध्ये भाजप किंवा भाजप-आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. यामध्ये आसाम, त्रिपुरा, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे. ईशान्य भारतातही अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि सिक्कीममध्ये भाजप किंवा त्यांची आघाडी सत्तेत आहे.
दरम्यान, या निवडणुकांमध्ये केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. केरळमध्ये डाव्यांचे सरकार सत्तेबाहेर गेले असले, तरी तेथे काँग्रेस सत्तेत आली आहे. तर तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाने द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक पक्षांना मागे टाकत १०० पेक्षा अधिक जागा जिंकून सर्वांना धक्का दिला आहे.
इतर राज्यांमध्येही वेगवेगळ्या पक्षांची सत्ता कायम आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणात काँग्रेस, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, तर मिझोराममध्ये झेडपीएम सत्तेत आहे. या निकालांमुळे देशातील राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे.