"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल

"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल

 


पुणे: पुण्यातील नसरापूर येथे एका साडेतीन वर्षीय चिमुरडीवर ६५ वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून खून केला. क्रूरतेचा कळस म्हणजे दगडाने ठेचलेला मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याची धक्कादायक घटना नसरापूर (ता. भोर) परिसरात उघडकीस आली असून, पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर शुक्रवारी रात्री आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी मोर्चा काढून बंद पुकारला. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ७ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून एक विनंती केली.

सुप्रिया सुळे नसरापूर घटनेवर काय म्हणाल्या?

"घडलेली घटना दुर्दैवी आहे, एकीकडे महाराष्ट्र दिन साजरा करत होतो आणि ही बातमी आली. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे आणि या आरोपीला लवकरात लवकर फासावर चढवले पाहिजे. नागरिकांची सुरक्षितता महत्वाची आहे. राजकारण होत राहील होत राहिल. पण माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की, नसरापूरला जी पोलीस चौकी आहे त्यात अपेक्षित पोलिस यंत्रणा नाही. महिला पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवलं पाहिजे.

हा नराधमाचा तिसरा गुन्हा...

"महिला आयोगाला आज अध्यक्ष नाही. न्याय मागायला जायचं कुठे? यंत्रणेने तातडीने नराधमाला पकडले. यासाठी पोलिस यंत्रणेचे आभार मानते.  पण यात आम्ही समाधानी नाही. ज्या क्रूर पद्दतीने ही हत्या झाली, ते पाहता हे खूपच वाईट आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा या नराधमाचा तिसरा गुन्हा होता. हा जर तिसरा गुन्हा आहे तर पहिल्या दोन गुन्ह्यात त्या नराधमाला जामीन कसा मिळाला? आमच्या लेकीची हत्या होईपर्यंत महाराष्ट्र सरकार थांबले आहे का?" असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला.

आम्हाला आश्वासन नको, कारवाई हवी आहे!

"आम्हाला आश्वासन नको, कारवाई हवी आहे. मुख्यमंत्री स्वतः वकील आहेत, गृहमंत्री आहेत. लोकांना वर्दीची भीतीच राहिलेली नाही. विकृतीला का भिती राहिली नाही? जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोवर शांत बसणार नाही. या माणसाला गावातून हाकलून दिले होते. आमचं पहिलं प्राधान्य आहे की या नराधमाला फाशी झाली पाहिजे. पुन्हा अशी घटना महाराष्ट्रात होऊ नये. लोकांची नाराजी रास्त आहे, एन्काऊंटर करण्याची मागणी बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांशी मंगळवारी आम्ही चर्चा करणार आहे. शक्ती कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.